Samrat Mahadik
सांगली : येथे सम्राट महाडिक यांचा सत्कार करताना मकरंद देशपांडे, विक्रम पावसकर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, दीपक शिंदे, पृथ्वीराज देशमुख, शेखर इनामदार, भगवानराव साळुंखे आदी.

गटा-तटाचे राजकारण न करता पक्ष बळकट करू : सम्राट महाडिक

सांगलीत पदग्रहण सोहळा :‘कधीही हाक मारा, मी तुमच्या पाठीशी’
Published on

सांगली : मी कुठल्या गटा-तटाचे राजकारण न करता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपचा सामान्य कार्यकर्ता हा जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक झाला पाहिजे, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. जिल्हाध्यक्ष म्हणून शिराळ्यापासून जतपर्यंत कधीही हाक मारा, तुमच्यासाठी कायम उभा असेन, अशी ग्वाही, भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी दिली.

सांगली येथे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यशाळा झाली. प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, भाजपा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य नीता केळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, किसान मोर्चा उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, राजाराम गरुड, विलास काळेबाग, मिलिंद कोरे प्रमुख उपस्थित होते.

महाडिक पुढे म्हणाले, भाजप जो कार्यक्रम देईल, तो तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. येत्या काळात सांगलीवर भाजपचाच झेंडा दिसेल. देशपांडे म्हणाले, पक्षाने सम्राट महाडिक यांची अध्यक्षपदी निवड पूर्ण विचार करून केली आहे. ते जिल्हाभर पक्ष मजबूत करतील. आमदार पडळकर म्हणाले, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मागितल्यावरच मिळतंय, असं नाही. सम्राट महाडिक यांना न मागता जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. देशमुख म्हणाले, सम्राट महाडिक यांचे संघटनकौशल्य चांगले आहे. त्यांना वनश्री नानासाहेब महाडिक यांचा मोठा वारसा आहे. त्यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मेळावे घ्यावेत. यावेळी आमदार भगवानराव साळुंखे, दीपक शिंदे, संग्राम देशमुख, नीता केळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

पालिका, झेडपीवर भाजपचाच झेंडा फडकेल

प्रदेश उपाध्यक्ष पावसकर म्हणाले, सम्राट महाडिक यांच्या पाठीशी उभे राहा. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आपल्या ताब्यात येतील, सांगलीवर भाजपचा झेंडा फडकताना दिसेल. सत्यजित देशमुख म्हणाले, मला सम्राट महाडिक यांनी साथ दिली. त्यामुळे मी आमदार झालो. आगामी निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 60 पैकी 40 जागा निवडून आणण्यासाठी नियोजन करूया.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news