

Govind Pansare Murder Case Sameer Gaikwad: कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकणातील मुख्य आरोपी समीर गायकवाड याचा आज सांगलीत मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचं कारण हे ह्रदय विकाराचा तीव्र धक्का असं सांगण्यात आलं आहे. त्याच्यावर सांगलीतील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार समीर गायकवाडची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्याला सांगलीतील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तो उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. अखेर त्याचा मृत्यू झाला. सनातन संस्थेचा साधक असलेला समीर गायकवाड कोल्हापुरातील गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणानंतर प्रकाशझोतात आला होता. तो या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी होता. तो सध्या जामीनावर बाहेर होता.
१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर घराजवळ गोळीबार झाला होता. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोल्हापूरमधील राजकीय तसेच समाजिक वर्तुळात कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा मोठा प्रभाव होता. तसेच ते पुरोगामी विचारांचे समर्थक अन् प्रसारक देखील होते. त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती.
या प्रकरणी २०१५ मध्येच समीर गायकवाडला सांगलीतून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो अनेक वर्षे तुरूंगात होता. नुकताच न्यायालयीन जामीन मिळवत तो बाहेर आला होता. पानसरे हत्या प्रकरणाची केस अजून न्यायालयात सुरू असून समीर गायकवाड हा या प्रकरणातील महत्वाचा दुवा आणि मुख्य संशयित होता. आता त्याच्या मृत्यूमुळे या प्रकरणावर काय परिणाम होतो याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.