मिरज : पुढारी वृत्तसेवा
मिरज परिसरात नशेच्या गोळ्यांची विक्री करणार्या तिघांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 55 हजार रुपये किमतीचा नशेच्या गोळ्यांचा साठा हस्तगत करण्यात आला. तिघांना न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी दिली. धनंजय प्रदीप गाडे (वय 22, रा. सुभाषनगर, मिरज), ओंकार संभाजी साळुंखे (22, रा. मंगळवार पेठ, मिरज) व महम्मदरफिक सादिक गोदड (24, रा. गोदड मळा, टाकळी रोड, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वरील तिघे मिरज शहरातील एका उद्यानाजवळ नशेच्या गोळ्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक करून त्यांच्याकडून 54 हजार 520 रुपये किमतीच्या 600 गोळ्यांची पाकिटे व दोन दुचाकी हस्तगत केल्या. त्यामध्ये पोलिस रेकॉर्डवर असलेला ओंकार संभाजी साळुंखे हा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांतून सध्या हद्दपार आहे. हद्दपार असतानाही तो मिरजेत अवैध गोळ्यांची विक्री करीत असताना आढळून आला.
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या औषधांच्या विक्रीस प्रतिबंध आहे. मात्र संशयितांनी या गोळ्या कोठून आणल्या, याची चौकशी सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी सांगितले. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयाने दि. 15 पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.