

आष्पाक आत्तार
वारणावती : विदर्भातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणलेल्या ‘तारा’ (एसटीआरटी-5) वाघिणीची अखेर जोडी जुळली. वन्यजीव विभागाने नुकत्याच टिपलेल्या व्हिडीओमध्ये तारा एका बलाढ्य वाघाच्या मागोमाग चालताना दिसली. पाचवेळा चांदोली धरण पोहत तिने हद्दनिश्चिती केल्याचे दिसते. वाघीण तिच्या हद्दक्षेत्रात दोन किंवा तीन नर वाघांचे क्षेत्र असल्यास, ती त्या प्रत्येकासोबत मीलन करू शकते. तारानेही हीच पद्धत अवलंबल्याचे वन्यजीव अभ्यासकाचे निरीक्षण आहे.
अभ्यासक सांगतात, चंदा वाघिणीच्या दबावामुळे तारा चांदोली धरण पोहत धरणाच्या पलीकडे गेली होती. त्यानंतरही तिने पाच वेळा धरण पोहून पलीकडील भागात स्वतःचे क्षेत्र निर्माण केले. या भागात एसटीआरटी-9 ‘शिलेदार’ पोहोचला आणि सुरुवातीला तारा व शिलेदार एकत्र दिसून आले. मात्र कालांतराने तिने शिलेदारसोबतचा वावर कमी केला.दरम्यान, ‘सेनापती’चा प्रभाव असलेल्या भागात ‘सुभेदार’चा वावर वाढू लागला. वन्यजीव अभ्यासकांनी ‘तारा’ व ‘सुभेदार’ यांना एकत्र शिकार करतानाही पाहिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘तारा’ ‘सेनापती’सोबत दिसली. त्यांच्यातील जवळीकता अभ्यासकांच्या लक्षात आली. सध्या ‘तारा’ एकाचवेळी तीन नर वाघांच्या हद्दीत वावरत आहे. ‘सेनापती’ व ‘सुभेदार’ यापैकी तिने अखेरीस ‘सेनापती’लाच प्राधान्य दिल्याचे निरीक्षण आहे. ‘चंदा’नंतर ‘तारा’सोबतही ‘सेनापती’चे मीलन झाल्याने सह्याद्रीतील सर्वात बलाढ्य वाघ म्हणून ‘सेनापती’चे वर्चस्व अधोरेखीत झाले. चंदा आणि तारा वाघिणींच्या हद्दक्षेत्रात चांदोली धरण पोहत सेनापती अस्तित्व टिकवून आहे. विशेष म्हणजे, स्वतःच्या हद्दीत सुभेदारलाही काही प्रमाणात वावरू देतो.