

आष्पाक आत्तार
वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सेनापती वाघ आणि ताडोबातून नुकतीच सोडण्यात आलेली चंदा वाघीण यांची जोडी जमली आहे. त्यांच्या प्रणयाराधनाच्या आवाजांनी सध्या चांदोलीचे खोरे दुमदुमू लागले आहे. सह्याद्रीत वाघांच्या वंशवृद्धीची ही चिन्हे आहेत. ऑपरेशन तारा यानिमित्ताने यशस्वी होत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्रीत हस्तांतरित केलेल्या चंदा वाघिणीने चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कोअर क्षेत्रात सध्या आपलं बस्तान बसवलं आहे. याच भागात 2023 पासून आपले हद्दक्षेत्र तयार केलेला सेनापती वाघ वाघिणीच्या शोधात होता. चंदा आल्यावर त्याच्या या शोधमोहिमेला विराम मिळाला आहे. ताडोबातून सह्याद्रीत आल्यानंतर चंदाला देखील नराच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यावर तिनेही आपल्या गंधखुणा सोडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे वन्यजीव विभाग, अभ्यासक यांसह सर्वांनाच प्रतीक्षा होती दोघांच्या भेटीची. त्यामुळे सह्याद्रीच्या कर्मचाऱ्यांनी देखील 24 तास सतर्क राहून निरीक्षणास सुरुवात केली आणि अखेरीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांमधला डॉमिनेट मेल म्हणजेच 01 सेनापती आणि ताडोबामधून नुकतीच आणलेली वाघीण 04 चंदा हे दोघेही नुकतेच एकत्र वावरताना दिसले.
सह्याद्रीमध्ये वाघांच्या मागावर असणाऱ्या आणि निरीक्षण करणाऱ्या पथकांच्या म्हणण्यानुसार, सात ते दहा दिवस सेनापती आणि चंदा या दोघांनी एकत्र वेळ घालवला. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये लवकरच ‘गुड न्यूज’ येईल, अशी अपेक्षा आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एका मृत गव्याजवळ रात्री दहा वाजून 13 मिनिटांच्या सुमारास चंदाची छबी टिपली गेली. त्यानंतर बरोबर पाऊण तासाने 11 वाजून दोन मिनिटांनी तिथे सेनापती दिसला. त्याच्या मागे पुन्हा चंदा उभी ठाकलेली दिसली. तिच्या रेडिओ कॉलरचे जीपीएस सिग्नल देखील कॅमेरा ट्रॅप लावलेल्या ठिकाणावरचेच मिळाले आहेत. तेव्हापासून चंदा आणि सेनापती ही जोडी चांदोलीत फिरत असून त्यांनी आपल्या मीलन क्रियेला देखील सुरुवात केली आहे. सध्या चांदोलीचे खोरे या वाघांच्या प्रणयाराधनाच्या आवाजांनी दुमदुमून गेले आहे.
प्रणयाराधनाच्या काळात वाघ एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी गर्जना म्हणजेच आवाज करतात. तसेच विशिष्ट गंधाचा वापर करतात. जोडी तयार झाल्यानंतर ते अनेक दिवस एकत्र घालवतात. यामध्ये अनेकदा मीलन होतं. मादीला गर्भधारणा झाल्यावर ती 16 आठवड्यांच्या कालावधीनंतर तीन ते चार बछड्यांना जन्म देते. पिले अतिशय गतीने वाढतात. पूर्ण वाढण्याचा त्यांचा कालावधी हा 18 महिन्यांचा असतो. पिले आई व भावंडांसोबत दोन ते अडीच वर्षे राहतात. नर आणि मादी वाघ आयुष्यभरात अनेक जोडीदार निवडू शकतात. त्यामुळे सेनापती हा ताराबरोबर देखील मीलन करू शकतो. यापुढच्या काळात सेनापती आणि चंदा या जोडीची नवीन वार्ता काय येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.