Black panther: ‘सह्याद्री‌’त दुर्मीळ ब्लॅक पँथरची प्रथमच एंट्री

गूड न्यूज : वन खात्याच्या कॅमेऱ्याने टिपली छबी
Black panther
Black panther
Published on: 
Updated on: 
आष्पाक आत्तार

वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रथमच काळा बिबट्या (ब्लॅक पँथर) दिसला. चांदोली राष्ट्रीय उद्यानातील कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचे छायाचित्र टिपले आहे. 20 एप्रिल रोजी ही नोंद झाली. ‌‘मेलानिस्टिक‌’ स्वरूपातील या बिबट्याला सर्वसाधारण ‌‘ब्लॅक पँथर‌’ असे संबोधले जाते.

चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना वन्यजीव अभयारण्य यांना एकत्रित करून 5 जानेवारी 2010 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. दुर्मीळ आणि संकटग्रस्त सस्तन प्राण्यांसाठी हा परिसर महत्त्वाचा अधिवास. येथे काळ्या बिबट्याची नोंद झाली नव्हती. अलीकडे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कॅमेरा ट्रॅपची पाहणी करताना हा बिबट्या त्यांच्या निदर्शनास आला. 20 आणि 21 एप्रिल रोजी टिपलेल्या तीन छायाचित्रांमधून तो येथे असल्याचे स्पष्ट झाले.

वेगळी प्रजाती नव्हे...

वन्यजीव अभ्यासकांच्या मते ‌‘ब्लॅक पँथर‌’ ही वेगळी प्रजाती नाही. बिबट्याच्या शरीरात ‌‘मेलानिन‌’ या रंगद्रव्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्याचा रंग पूर्णतः काळा दिसतो. या प्रक्रियेमुळे शरीरावरील ठिपके स्पष्ट दिसत नाहीत. मात्र, नीट निरीक्षण केल्यास ते दिसतात.

...तर पांढरा बिबट्या

‌‘ल्यूसीझम‌’ अवस्थेत मेलानिनचे प्रमाण कमी झाल्यास पांढऱ्या रंगाचा बिबट्या आढळू शकतो. ही अनुवंशिक वैशिष्ट्ये असून, ती कोणत्याही रोगाशी संबंधित नाहीत.

1) ‌‘ब्लॅक पँथर‌’ संज्ञा प्रत्यक्षात विविध प्रदेशांतील काळ्या रंगाच्या मोठ्या मांजरींसाठी वापरली जाते.

2) भारत व आफ्रिकेतील काळे बिबटे तसेच दक्षिण अमेरिकेतील काळे जॅग्वार यांना या नावाने ओळखले जाते.

3) ‌‘पँथेरा‌’ या लॅटिन शब्दावरून ही संज्ञा रूढ झाली असावी.

4) भारतात जॅग्वार आढळत नसल्यामुळे येथे दिसणारा काळा बिबट्या हाच ‌‘ब्लॅक पँथर‌’ म्हणून ओळखला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news