स्वप्निल पाटील
मिरज : पुणे ते कोल्हापूर धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस कोरोनानंतर अद्यापही विशेष रेल्वे म्हणूनच धावत आहे. गेली दोन ते तीन वर्षे या रेल्वेचा दर्जा अद्याप विशेषच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला विनाकारण भुर्दंड लावला जात आहे. या रेल्वेचा विशेष दर्जा रद्द करून ही रेल्वे पूर्ववत मुंबईपर्यंत सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. सह्याद्री एक्सप्रेसचा नफा दुप्पट झाला आहे, मात्र विस्तार रखडला आहे.
कोरोनामध्ये मिरजमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर काही गाड्या पूर्ववत करण्यात आल्या, तर काही गाड्यांचे अंतर कमी करण्यात आले. कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस कोरोनामध्ये बंद करण्यात आली होती. ती लवकर सुरूच केली नाही. प्रवाशांची ही मागणी लावून धरल्याने ही विशेष रेल्वे म्हणून सुरू करण्यात आली. परंतु ती केवळ पुण्यापर्यंतच सुरू करण्यात आली.
परंतु ही रेल्वे पुण्यापर्यंत सुरू करताना विशेष रेल्वे म्हणून सुरू केल्याने तिला तिकीट दरही विशेष रेल्वेचाच लावण्यात आला आहे. विशेष रेल्वेचा कालावधी किती असतो? एखादी गाडी सुरू केल्यानंतर त्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यानंतरही ती रेल्वे विशेष कशी? असा सवाल आता प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रवाशांतून विचारला जात आहे.
कोल्हापूर ते पुण्यापर्यंत जाताना मुंबईपर्यंतच्या प्रवासाचे तिकीट आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला विनाकारण भुर्दंड लावला जात आहे. त्यामुळे प्रवासीही संतप्त झाले आहेत. या रेल्वेचा मुंबईपर्यंत विस्तार करा, अशी सातत्याने मागणी होत आहे. परंतु मध्य रेल्वेकडून सातत्याने कानाडोळा करण्यात येत आहे. मुंबईमध्ये फलाट उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जात आहे. परंतु या रेल्वेचा मुंबईपर्यंत विस्तार झाल्यास कोल्हापूर, मिरज, सांगलीमधील प्रवाशांची सोय होणार आहे. त्यामुळे तातडीने या गाडीचा विस्तार करावा, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.