

पलूस : दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत यांच्या निषेधार्थ युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पलूसच्यावतीने सोमवारी खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. महिलांनीही आंदोलनात सहभागी होत खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख विनायक गोंदिल म्हणाले, सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांबाबत केलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असून त्यांनी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी तत्काळ विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही.
युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी शिंदे म्हणाले, सदाभाऊ खोत हे निर्लज्जपणे विद्यार्थ्यांचा अपमान करत आहेत. अशा व्यक्तीला आमदारपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी वक्तव्याबद्दल तातडीने माफी मागावी, अन्यथा युवासेना राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल.
यावेळी डी. ए. पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नसीमा नदाफ, युवासेना तालुका प्रमुख मिलिंद शिंदे, नितीन शिंदे, संदीप कुंभार, ॲड. सुधीर जाधव, सुशांत पाटील, अजित राजमाने, विटा शहर प्रमुख जीवन इंगळे, अभिजित निकाळजे, समरजित पवार, अरुण गोंदिल आदी सहभागी झाले होते.