Sangli News: सभापती निवडीचा मुहूर्त ठरला; 10 मार्चला प्रक्रिया

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रमही लवकरच जाहीर होणार : इच्छुकांची मोर्चेबांधणी
Sangli ZP
Sangli ZPPudhari
Published on
Updated on

सांगली : जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांची सभापती निवड मंगळवार, दि. 10 मार्चरोजी होणार आहे. सभापती निवडीसाठी सभा बोलावण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शुक्रवारी दिले. त्यामुळे आता पंचायत समित्यांमधील सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीबाबतही मार्चच्या पहिल्या आठवड्यात कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.

गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल सोमवार, दि. 9 फेब्रु्रवारीरोजी जाहीर झाला. मात्र निकालानंतर 16 दिवस उलटूनही जिल्हा परिषद अध्यक्ष, तसेच पंचायत समित्यांच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला नव्हता. परंतु, दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापतींची निवड करून पहिली बैठक दि. 20 मार्चपूर्वी घ्यावी, असे आदेश ग्रामविकास विभागाने दि. 25 फेब्रुवारीरोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 10 मार्चरोजी विशेष सभा घेऊन यामध्ये सभापती आणि उपसभापती निवड करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सभापती निवडीसाठी विशेष सभा घेण्यास उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

पंचायत समित्यांचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीपूर्वी सभापतींची निवड होणे गरजेचे आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सभापती निवडी होणार आहेत. दहा पंचायत समित्यांपैकी खानापूर-आटपाडी पंचायत समितींवर शिवसेनेने सत्ता काबीज केली आहे. कडेगाव व पलूसमध्ये काँग्रेस, जतमध्ये भाजप, वाळवा, कवठेमहांकाळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), तासगावमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष, तर शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादीला जनतेने कौल दिला आहे. मिरज पंचायत समितीत भाजप सत्तेच्या जवळ आहे. पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडी झाल्यानंतर सहा ते सात दिवसांत जिल्हा परिषद अध्यक्ष निवड होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

तालुक्याचे नाव आणि सभापती निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्याचे नाव असे : आटपाडी : समाधान शेंडे, जत : अजय नष्टे, खानापूर ; विक्रम बांदल, कडेगाव : रणजित भोसले, तासगाव : सविता लष्करे, कवठेमहांकाळ : विजया यादव, पलूस : विवेक काळे, वाळवा : श्रीनिवास अर्जुन, शिराळा : रघुनाथ पोटे, मिरज : उत्तम दिघे.

पंचायत समिती सभापती निवडीबाबतचे पत्र आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत. पंचायत समितीचे सभापती पद मिळवण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news