

सांगली : सांगलीत सोमवारी सकाळी आगीमध्ये बस खाक झाली. ही घटना वाईट घडली. एक मात्र चांगले झाले, चालकासह सर्वजण बचावले.
आग का लागली असावी ?
शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अग्निशमन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.
कोठे ? कधी ?
तरुण भारत स्टेडियमसमोरील वैरण अड्ड्याजवळ. सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास. खासगी बस खाक.
लढणारी माणसं...
महापालिकेचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी कासाप्पा माने, दत्तात्रय माने, सुरेश अलगूर, कृष्णराव मोरे, फायरमन रोहित घोरपडे, दत्तात्रय पाटील, अण्णासाहेब देशमुख यांनी वेळीच घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली.
काय घडले?
बस बीडहून सांगलीकडे येत होती. तरुण भारत स्टेडियमसमोरून ही बस सांगली मध्यवर्ती बस स्थानकाच्या दिशेने जात होती. चालक केबिनमध्ये आगीच्या ज्वाला दिसून आल्या. चालकाने बस तत्काळ रस्त्याकडेला घेत थांबवली. शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याचे समजताच प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. चालक तसेच प्रवासी बसमधून बाहेर पडले.
...आणि आग आटोक्यात
महापालिकेचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी कासाप्पा माने यांना आगीची माहिती दूरध्वनीवरून मिळाली. त्यांनी स्टेशन चौकातील अग्निशमन केंद्र व टिंबर एरिया अग्निशमन केंद्राशी संपर्क साधून घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. अग्निशमन विभागाची दोन वाहने आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. दोन अग्निशमन वाहनांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली.