

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी आज (दि.८) विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली. हंगामी विधानसभेचे अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी ही शपथ दिली. नव्या महाराष्ट्राकडे आशेने बघणाऱ्या सामान्य जनतेला साक्षी ठेवून रोहित पाटील यांनी ही शपथ घेतली.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील हे तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. पाटील कुटुंबीयांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी, माजी खासदार संजय पाटील यांना धूळ चारून त्यांनी विधानसभेत जोरदार मुसंडी मारली. देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून रोहित पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. वयाची २५ वर्षे पूर्ण होताच पाटील यांनी विधानसभेत 'एन्ट्री' केली.
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघावर आर.आर.पाटील कुटुंबीयांचे गेल्या ३५ वर्षांपासून वर्चस्व आहे. या मतदारसंघाचे दिवंगत नेते आर.आर.पाटील, त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी प्रतिनिधित्व केले आहे. तर त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असणारे संजय पाटील यांना एकदाही आर. आर. पाटील कुटुंबीयांचा पराभव करता आला नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय पाटील यांनी पुन्हा आर. आर. पाटील कुटुंबीयांसमोर शड्डू ठोकला होता. ही निवडणूक रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील अशी झाली. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. सुमारे ३५ वर्षांचे अधुरी स्वप्न पूर्ण करत कुस्ती निकाली करायची, या इराद्याने संजय पाटील गट पेटून उठला होता. मात्र या निवडणुकीत रोहित पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी अवघ्या २५ व्या वर्षी विधानसभेत पाऊल ठेवले.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ घेणे टाळले होते. इव्हीएम मशीनवरती मतदान बंद करून ते बॅलेट पेपरवर घ्यावे, अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांनी पहिल्या दिवशी शपथ घेतली नाही. मात्र आज दुसऱ्या दिवशी बहुतांशी आमदारांनी शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली.
शपथविधी पूर्ण झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पाटील म्हणाले, आज आर.आर.पाटील यांची खऱ्या अर्थाने आठवण येत आहे. येत्या कालावधीत मतदारसंघातील विविध प्रश्नांवर काम करू. लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मतदार संघातील प्रलंबित प्रश्न निपटून सामान्य जनतेने माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवू. शपथविधी सोहळ्यासाठी तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अनेक कार्यकर्ते आज मुंबईला गेले होते. रोहित पाटील यांचे बंधू रोहन व राहुल यांच्यासह त्यांचे कुटुंबीयही शपथविधीसाठी मुंबईत उपस्थित होते.