Rohit Patil: आ. रोहित पाटील संतापले; जबाबदार अधिकारी गैरहजर

तासगाव आपत्ती व्यवस्थापन मान्सूनपूर्व आढावा बैठकीपूर्वी घडलेला प्रकार
Rohit Patil
Rohit Patil
Published on
Updated on

तासगाव : येथील तहसील कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीस जबाबदार अधिकारी उपस्थित न राहिल्याने आमदार रोहित पाटील चांगलेच भडकले. अखेर बैठक सुरू होण्यापूर्वीच नाराजी व्यक्त करून ते बैठकीतून निघून गेले.

येथील तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी 11 वाजता मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन केले होते. आमदार पाटील व तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार होती. त्यानुसार आमदार 11 वाजून 20 मिनिटांनी तहसीलदार यांच्या कार्यालयाजवळ पोहोचले. ते येत असल्याची कल्पना तहसीलदार पाटोळे यांना दिली होती. मात्र त्यांच्या स्वागतासाठी तहसीलदार आले नाहीत.

याकडे दुर्लक्ष करून आमदार पाटील सरळ तहसीलदार पाटोळे यांच्या दालनात पोहोचले. बैठकीसाठी विविध खात्यांच्या जबाबदार अधिकाऱ्यांना बोलावले होते. मात्र बहुतांशी विभागप्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित नसल्याचे त्यांना दिसून आले. आमदार पाटील हे नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ थांबूनही अनेक विभागाचे विभागप्रमुख बैठकीस उपस्थित राहू न शकल्याने आमदारांचा पारा चढला. अधिकारीच उपस्थित नाहीत, तर बैठक घेऊन काय उपयोग? असा सवाल करून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जे उपस्थित होते, ते कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी हजर होते. उपस्थित नसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली जाणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

हे अधिकारी नाही आले...

बैठकीस प्रामुख्याने तासगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तासगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लेंडवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका पशुधन विकास अधिकारी, सावळज महावितरणचे सहायक अभियंता, दुय्यम निबंधक, गटशिक्षणाधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, पोलिस निरीक्षक आदी महत्त्वाचे अधिकारी आले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news