

मिरज : कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेसवर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सिनेस्टाईल दरोडा टाकण्यात आला. सिग्नल वायर कापून तसेच सिग्नलवर शाल टाकून रेल्वे रोखण्यात आली. त्यानंतर थरारक असा सिनेस्टाईल दरोडा टाकून चोरट्यांनी पलायन केले. दोन महिलांचे सोन्याचे दागिने व एका प्रवाशाचा मोबाईल असा 52 हजारांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला.
यावेळी महिलांनी आरडाओरडा केल्याने सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला. मिरज ते पुणे रेल्वे मार्गावरील शेणोली स्थानकाजवळ हा थरारक प्रकार घडला. याप्रकरणी मीना विकास ओमापती यांनी मिरज रेल्वे पोलिसात फिर्याद दिली आहे.
कोल्हापूरमधून सह्याद्री एक्स्प्रेस नियमित वेळेत पुण्याकडे रवाना झाली. या रेल्वेतून मीना विकास ओमापती (35, रा. मिरज) व आशा नारायण पवार (रा. विश्रांतवाडी, पुणे) हे एस-3 बोगीतून, तर रंजन दयानिधी साहू (41, रा. कल्याण इस्ट, ठाणे) हे जनरल बोगीतून प्रवास करीत होते. सह्याद्री एक्स्प्रेस मध्यरात्री धावत असल्याने या रेल्वेवर दरोडा टाकण्यासाठी तीन ते चार दरोडेखोर शेणोली स्थानकाजवळ दबा धरून बसले होते.
रेल्वे शेणोली स्थानकाजवळील मिरज आऊटरजवळ आल्यानंतर चोरट्यांनी सिग्नल वायर कापली. ही बाब कराड रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेच्या लक्षात आली. त्यामुळे रेल्वेकडून तातडीने हालचाली करून घातपाताची शक्यता गृहित धरून आपत्कालीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
दरोडेखोरांच्या शोधासाठी पथक ताकारीत
सह्याद्री एक्स्प्रेसवर दरोडा पडल्याची माहिती मिळताच मिरज रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सराईत गुन्हेगारांनी हा दरोडा टाकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने मिरज रेल्वे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत; परंतु यासाठी मिरज रेल्वेकडील सहायक पोलिस निरीक्षक सुभाष मुंढे यांच्यासह पथक शेणोली, ताकारी परिसरात तळ ठोकून होते.