

जत : जत तालुक्यातील 22 हजार सभासदांच्या हक्काचा साखर कारखाना अवघ्या 47 कोटीत चुकीच्या पद्धतीने विकला गेला, भाडेदेखील यापेक्षा जास्त होते. त्यामुळे हा सभासदांवरील मोठा अन्याय आहे. प्रस्थापित आता जतचा विकास करू, असे सांगत असले, तरी त्यांना जनतेचा साखर कारखाना परत द्या. अन्यथा कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, या कारखान्याची 280 एकर जमीन असूनही, साखर कारखाना अवघा 47 कोटींमध्ये ढापला गेला. म्हैसाळ कालव्याकरिता भूसंपादित झालेल्या जमिनीबाबत कोट्यवधींचा परतावा मिळाला आहे. संस्थानिक श्रीमंत डफळे यांच्या योगदानामुळे हा राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना उभा राहिला. तालुक्यातील शेतकरी, मजूर, कष्टकर्यांनी शेळ्या, मेंढ्या, धान्य विकून घामाच्या पैशातून, सोने गहाण ठेवून, कर्ज काढून शेअर्स घेत कारखाना उभारला. मात्र, प्रस्थापितांच्या स्वार्थी राजकारणामुळे हा कारखाना बंद पडला. त्यावर प्रशासक नेमण्याचे पापही त्याच प्रस्थापितांनी केले.
ते म्हणाले, कारखान्याच्या दिवाळखोरीसाठी तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ जबाबदार आहेत. कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांनी हा साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्याची तयारी दाखवली होती, मात्र कमिशन न मिळाल्याने प्रस्थापितांनी चुकीची पद्धत अवलंबली. सभासदांच्या नावावर कारखाना परत येईपर्यंत जत साखर कारखान्याचे धुराडे पेटवू देणार नाही.