

Retired Clerk Unaccounted Assets in Sangli
सांगली : सांगली महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडील निवृत्त लिपिकाकडे ३६ लाखांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. बुधवारी संबंधित कर्मचार्यासह त्याच्या पत्नीवर मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन भीमराव उत्तुरे (वय 63) व पत्नी वंदना नितीन उत्तुरे (दोघे रा. सांगलीकर मळा, मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महापालिकेच्या मिरज कार्यालयाकडील घरपट्टी विभागात नितीन उत्तुरे हा लिपीक होता. तो 1990 मध्ये तत्कालीन नगरपालिकेत नोकरीस लागला. 2019 मध्ये तो सेवानिवृत्त झाला. या कालावधीत त्याने संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू होती. या चौकशीत उत्तरे याच्या उत्पन्नापेक्षा 163 टक्के अधिक म्हणजे 35 लाख 16 हजार 192 इतकी रक्कम भ्रष्ट मार्गाने मिळविल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी त्याची पत्नी वंदना हिनेही हातभार लावल्याचे चौकशीत समोर आले. त्यानुसार दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने केली.
लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचार्याने बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याबाबत खात्रीलायक माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. तसेच कोणताही अधिकारी, कर्मचारी लाचेची मागणी करीत असेल तर तात्काळ संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संबंधितावर कारवाई केली जाईल.
- अनिल कटके, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली