Sangli News|मुंबई विद्यापीठास अण्णा भाऊंचे नाव द्या

वाटेगाव येथे लोकशाहीर विचार मंथन परिषदेत ठराव
Sangli News
Published on
Updated on

कासेगाव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे त्यांच्या विचारांना साजेशे भव्य स्मारक वाटेगाव (ता. वाळवा) येथे करण्यात यावे. तसेच मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या अद्वितीय योगदानाचा सन्मान म्हणून मुंबई विद्यापीठाला अण्णा भाऊंचे नाव देण्यात यावे आणि त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात यावा. या मागण्यांसाठी मंत्रालयावर भव्य मोर्चा व आंदोलन छेडले जाईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.

वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'विचार मंथन परिषदेच्या' अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. डॉ. पाटणकर म्हणाले, अण्णा भाऊंच्या जन्मभूमी असलेल्या वाळवा तालुक्याच्या मुख्य ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा व स्मारक सरकारने उभारले पाहिजे. राजारामबापू बँकेने पुढाकार घेऊन पुतळा उभारण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे, मात्र शासनाला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. कॉ. अतुल दिघे म्हणाले, "अण्णा भाऊंनी सर्व शोषित घटकांसाठी कार्य केले. सर्व डाव्या पक्षांनी व संघटनांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. स्वागताध्यक्ष रवींद्र बर्डे म्हणाले, शासनाने घोषित केलेले अण्णा भाऊंचे स्मारक केवळ कागदावर राहू नये, यासाठी जागरूक राहिले पाहिजे.

या वेळी दिगंबर कांबळे, धनाजी गुरव, जयंत निकम, बी. जी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. परिषदेत अण्णा भाऊंचे वाटेगाव येथे स्मारक, अण्णा भाऊंना भारतरत्न, तसेच मुंबई विद्यापीठास अण्णा भाऊंचे नाव द्यावे, असे ठराव मांडण्यात आले. यासाठी ३० सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाहीर सदाशिव निकम, शाहीर रमेश बल्लाळ व सहकाऱ्यांनी शाहिरी जलसा सादर केला. धम्मसागर भारती यांनी सूत्रसंचालन केले, तर योगेश साठे यांनी आभार मानले. या प्रसंगी भाऊसाहेब यादव, नामदेव पाटसुते, अर्जुन पाटसुते, उत्तम घोलप, अनिल म्हमाणे, जनार्दन साठे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news