Devendra Fadnavis| उर्वरित शेतकऱ्यांना दोन महिन्यांत कर्जमाफीची रक्कम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आष्टा येथे अण्णासाहेब डांगे यांचा ९१ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार
Devendra Fadnavis
आष्टा : येथे माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांचा ९१ व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल नार्वेकर, प्रा. राम शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, चंद्रकांत पाटील, धैर्यशील माने, धनंजय महाडिक, सुहास बाबर, सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत, सुधीर गाडगीळ, विनय कोरे, ॲड. चिमण डांगे, विश्वनाथ डांगे, सम्राट महाडिक आदी. (छाया : सचिन सुतार)
Published on
Updated on

सांगली : राज्य सरकारने ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून, पहिल्या टप्प्यात पाच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. पुढील दोन महिन्यांत उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे जमा होतील. जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करीत होते, त्यांच्या खात्यावरही ५० हजार रुपये लवकरच जमा केले जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आष्टा येथे संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी आयोजित सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी डॉ. डांगे यांच्या ‌'आम्रवृक्ष‌' या आत्मचरित्राचे प्रकाशन, तसेच शैक्षणिक संकुलातील तीन इमारतींचे उद्‌घाटन फडणवीस यांच्याहस्ते झाले.यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, युतीचे सरकार सत्तेत आले, त्यावेळी ज्येष्ठ मंत्री म्हणून अण्णासाहेब डांगे यांच्याकडे जबाबदारी वाढली होती. गोपीनाथ मुंडे हे नेते होते. त्यांच्यानंतर प्रोटोकॉलनुसार मान अण्णासाहेब डांगे यांचा होता. प्रशासन आणि सचिवांवर त्यांची पकड होती. अगदी शौचालयाची निर्मिती करताना किती निधी ठेवला पाहिजे, निधीचा अधिक वापर कसा होतो, याचे अण्णासाहेब सविस्तर वर्णन करीत. त्यामुळे सचिवदेखील चकित व्हायचे. प्रत्येक विषयाची त्यांना सखोल माहिती आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून गावोगावी पाणी योजना उभारल्या. त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळेच महाराष्ट्र टँकरमुक्त झाला.

कर्जमाफीमागे अण्णासाहेब डांगे यांची प्रेरणा

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात कर्जमाफीचा लढा उभारला होता. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी यांनी हा लढा उभारला; मात्र हा लढा व्यापक करण्याचे काम अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केले. डांगे यांच्या लढ्याच्या प्रेरणेतूनच सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news