

सांगली : मिरज रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत सापडलेल्या महिलांचे नातेवाईक सापडले, मात्र तिच्या मृत्यूनंतर... विशेष म्हणजे पंधरा वर्षांपूर्वी ही महिला घरातून बेपत्ता झाली होती. तिची बहीण तिचा शोध घेत होती. यासाठी जहीर अहमद बशीर मुजावर या सामाजिक कार्यकत्यांने मोलाचे योगदान दिले.
वेडसर आणि बेवारस स्थितीत ही महिला मिरज रेल्वे स्थानकावर रडत होती. तिच्या पोटात दुखत होत होते. तिला नीट बोलता येत नव्हते. जहीर मुजावर याने तिची भेट घेतली. तिला भाजी-भाकरी आणून दिली. अंगात ताप असल्यामुळे तिला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी तिला निमोनिया झाल्याचे निदान झाले. उपचाराचा उपयोग न होता तिने गेल्या आठवड्यात डोळे मिटले. पोलिस आले, पंचनामा झाला ‘बेवारस महिलेचा मृत्यू’ म्हणून नोंद झाली. काही दिवस तिचा मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला.
जहीर मुजावर यांनी तिची रेल्वे स्थानकावरील चित्रफीत व्हायरल केली. तिची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यात त्याला यश आले. ज्या दिवशी अंत्यसंस्कार करायचे होते, त्याच्या काही तास आधी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला. संबंधित महिला तासगाव तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले. ‘ती आमची बहीण आहे. पंधरा वर्षांपूर्वी ती हरवली होती’, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली. कुटुंबीयांनी कागदोपत्री ओळख पटवून दिली. पोलिसांची खात्री झाल्यानंतर तिचं दफन कुटुंबीयांच्या उपस्थितीत करण्यात आलं. महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे कर्मचारी इम्रान नदाफ, ताहीर बारगीर, सहाम काझी, हाफिज फैयाज यांचे यासाठी सहकार्य झाले. त्याचबरोबर मिरज सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी यांनी कायदेशीर मदत केली.