

आटपाडी : आटपाडी बाजार समितीतील मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर्समध्ये डाळिंबाला मिळालेल्या विक्रमी दरामुळे शेतकर्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. श्रावण महिन्यात वाढलेल्या मागणीमुळे दरात चांगली उसळी आल्याचे अध्यक्ष पंढरीनाथ नागणे यांनी सांगितले. आटपाडी बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात आवक वाढली आहे. सध्या दररोज 4 ते 5 हजार क्रेटची आवक होत आहे. आटपाडीसह, सांगोला, अकलूज, नातेपुते, माळशिरस, दौंड, इंदापूर, अहमदनगर, अक्कलकोट तसेच कर्नाटकातील विजापूर व बेळगाव परिसरातून दर्जेदार डाळिंबे येत आहेत.
डाळिंब सौदे बाजारात मागणी वाढल्यामुळे भावही सातत्याने वाढत आहेत. श्रावण महिन्यातील उपवास सुरू आहेत. त्यामुळे दर्जेदार मालाला रास्त भाव मिळत असल्याने बळीराजा सुखावला आहे. सौदे बाजारात रवींद्र गायकवाड, गुरसाळे यांच्या डाळिंबाला प्रतिकिलोस 72, 102, 164, 311 रुपये दर मिळाला. पिलीव येथील रामचंद्र भैस यांच्या मालाला 91, 110, 171, 251 रुपये दर मिळाला. भगतवाडीच्या विठ्ठल फडतरे यांच्या मालाला 80, 100, 170, 211 रुपये दर मिळाला. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या डाळिंबाला 80, 110, 161, 200 रुपये दर मिळाला.