

आटपाडी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने शुक्रवारी आपल्या कामगिरीचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. भगवा जातीच्या डाळिंबाची तब्बल 25 टन आवक नोंदवून बाजार समितीला सेसच्या माध्यमातून तब्बल 1,14,131 रुपये महसूल मिळाला, तर शासन महसूलही 11,403 रुपये झाला. पारदर्शक कारभार, आधुनिक सोयी-सुविधा आणि शेतकरीहिताच्या उपक्रमांमुळे आटपाडी बाजार समितीने महसूल वाढीत नवा टप्पा गाठला आहे.
आटपाडी बाजार समितीतील आधुनिक पॅकिंग सेंटर, व्यापार्यांसाठी अनुकूल सुविधा, शेतकर्यांसाठी सुलभ व्यवहार पद्धती, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय आणि कार्यक्षम व्यवस्थापन यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाचा विश्वास दृढ झाला आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये आटपाडी बाजार समितीने 22 वा क्रमांक आणि कोल्हापूर विभागात अव्वल स्थान पटकावले आहे. सभापती संतोष पुजारी, उपसभापती सुनील सरक, सचिव शशिकांत जाधव आणि संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखालील बाजार समितीची वेगाने प्रगती होत असून कर्मचार्यांच्या मेहनतीमुळे हा विक्रम शक्य झाल्याचे मानले जात आहे.