

ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीचे रणांगण तापू लागले आहे. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या असल्याने उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीचे व अंतर्गत गटबाजीचे आव्हान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व महायुतीच्या आघाडीसमोर असणार आहे. ही बंडखोरी थोपविण्यात दोन्ही गटांना कितपत यश येते, ते अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. अंतर्गत गटबाजी दोन्ही गटांना शेवटपर्यंत डोकेदुखी ठरणार आहे.
पालिकेची निवडणूक दुरंगी होईल, असे सध्या तरी चित्र आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व महायुतीकडून ही निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काही अपवाद सोडले, तर अद्यापही अनेकांना आपणाला उमेदवारी मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे गेली नऊ वर्षे निवडणुकीची तयारी केलेले अनेक इच्छुक उमेदवार सध्या अस्वस्थ आहेत. तीस जागांसाठी दोन्हीकडे दीडशे ते पावणेदोनशे इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे यातील कोणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर आहे. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याचीही अनेकांनी तयारी केली आहे. शिवाय एका गटाला उमेदवारी मिळाली, तर दुसरा गट नाराज होणार आहे. एकमेकांच्या जिरवाजिरवीत गटबाजीला उधाण येणार आहे. त्यामुळे बंडखोरांचे व गटबाजीचे मोठे आव्हान असणार आहे.
प्रत्येक निवडणुकीत आता युवा कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असे नेतेमंडळीचे वक्तव्य असते. मात्र प्रत्येक वेळेस काहीतरी कारण सांगून युवा कार्यकर्त्यांना थांबवले जाते. या निवडणुकीत तरी युवा कार्यकर्त्यांना संधी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
संधीच्या प्रतीक्षेत अनेक युवा कार्यकर्ते आता प्रौढ झाले आहेत. प्रत्येक निवडणुकीत केवळ प्रस्थापितांचाच विचार केला जातो. त्यामुळे युवा कार्यकर्ते व सामान्य घरातील उमेदवार कधी नगरपालिकेत जाणार? असाही प्रश्न उपस्थित केला आहे.