

सांगली : शासनाच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांनी सन 2025-26 या वर्षासाठी वार्षिक मूल्य दर (रेडिरेकनर) तक्ते प्रसिद्ध केले आहेत. सांगली महानगरपालिका क्षेत्रात रेडिरेकनर दरात सरासरी 5.70 टक्के वाढ केली आहे. रेडिरेकनर दरातील वाढ तसेच या वाढीमुळे महापालिकेच्या विकास शुल्कात वाढ होणार आहे. त्यामुळे सदनिकांचे दर वाढणार आहेत. ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे.
महाराष्ट्र मुद्रांक नियम 1995 अन्वये दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आकारण्याकरिता वार्षिक मुल्यदर तक्ते व मूल्यांकन मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी महानिरीक्षक, पुणे यांच्याकडून प्रतिवर्षी 1 एप्रिल रोजी जारी केल्या जातात. त्यानुसार 2025-26 या वर्षासाठी वार्षिक मूल्य दर तक्ते जारी झाले आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात सरासरी 3.36 टक्के वाढ, प्रभाव क्षेत्रात 3.29 टक्के, नगरपालिका / नगरपंचायती क्षेत्रात 4.97 टक्के वाढ व महानगरपालिका क्षेत्रात 5.95 टक्के वाढ (मुंबई वगळता) करण्यात आली आहे. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रासाठी रेडिरेकनर दरात सरासरी 5.70 टक्के वाढ केली आहे.
सांगली क्रेडाईचे अध्यक्ष जयराज सगरे म्हणाले, यावर्षी रेडीरेकनर दरात वाढ करू नये व दर स्थिर ठेवावेत, अशी विनंती सांगली क्रेडाईने महाराष्ट्र शासनाकडे पत्राद्वारे केली होती. सांगली महापालिकाक्षेत्रामध्ये रेडी रेकनर दरामध्ये 5.70 टक्के इतकी मोठी वाढ होईल असे अपेक्षित नव्हते. सांगली महापालिका क्षेत्रामधील विस्तारित भागात अगोदरच रेडी रेकनरचे दर हे मार्केट दरापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे या भागात सदनिका खरेदी करताना अधिकचा भार ग्राहकांना पडत होताच, आता रेडी रेकनरच्या वाढीव दरामुळे मुद्रांक शुल्कामध्ये आणखी भर पडेल. त्याचबरोबर महापालिका विकासशुल्कमध्ये वाढ झाल्याने सदनिकांचे दरही वाढतील. त्याचा ग्राहकांना फटका बसेल.