

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात रेडीरेकनर दरात सरासरी 5.70 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सदनिकांचे सरकारी मूल्यांकन वाढले आहे. घर घेऊ इच्छिणार्यांवर मुद्रांक शुल्कचा भार वाढणार आहे. एकूणच रेडीरेकनर दरवाढीने घरांचे स्वप्न महागले आहे.
शासनाच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठी वार्षिक मूल्यदर तक्ते (रेडीरेकनर) प्रसिद्ध केले आहेत. 1 एप्रिल 2025 पासून रेडीरेकनरचे नवे दर लागू केले आहेत. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात रेडीरेकनर दरात सरासरी 5.70 टक्के वाढ झाली आहे. भागनिहाय रेडीरेकनर दरातील वाढ वेगवेगळी आहे.
शहरातील सिव्हिल हॉस्पिटल रोड क्रांती क्लिनिक परिसरातील 1 हजार चौरस फुटांच्या सदनिकेचे मूल्यांकन 34.65 लाख रुपये होते, ते आता 38.12 लाख रुपये झाले आहे. म्हणजे सरकारी मूल्यांकन 3.47 लाखाने वाढले आहे. गव्हर्न्मेंट कॉलनीत एक हजार चौरस फूट सदनिकेची सरकारी किंमत 21.50 लाख रुपये होती, ती आता 23.76 लाख झाली आहे. सव्वा दोन लाखाने सरकारी मूल्यांकन वाढले आहे. महापालिकेच्या विविध भागात त्या-त्या क्षेत्रासाठीच्या रेडीरेकनर दरानुसार सरकारी मूल्य सुमारे 2 लाख ते 4 लाखाने वाढले आहे.
खुल्या जमिनीच्या रेडीरेकनर दरात तुलनेने कमी वाढ आहे. मात्र सदनिका, ऑफिस, दुकाने, औद्योगिक मिळकतींच्या रेडीरेकनर दरात जास्त वाढ झाली आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. मुद्रांक शुल्कसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. पर्यायाने खरेदीसाठी जादा रक्कम चुकती करावी लागणार आहे.
बाजारभाव हा शक्यतो सरकारी मूल्यांकनापेक्षा जास्त असतो. त्यामुळे मुद्रांक शुल्कचा खर्च कमी करण्यासाठी सरकारी मूल्यांकनानुसार खरेदी दस्त करण्याचे प्रकार होत असतात. पण आता सरकारी मूल्यांकनात वाढ झाल्याने त्याप्रमाणात मुद्रांक शुल्क वाढणार आहे. 1 हजार चौरस फुटांच्या सदनिकेचे सरकारी मूल्यांकन 2 लाख ते 4 लाखाने वाढले असल्याने जे सरकारी मूल्यांकनाने खरेदी व्यवहार दाखवत होते, त्यांचा मुद्रांक खर्च 12 हजार ते 24 हजार रुपयांनी वाढणार आहे.