

वाळवा ः वाळवा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी आणि त्यांच्या पथकाने रेशन धान्य दुकानांची पाहणी करून तपासणी केली. रेशनवर मिळणारे गहू, तांदूळ हे धान्य आठवडा बाजारात लोक विकत असल्याचे सचित्र वृत्त दै. ‘पुढारी’ने दिले होते. त्याची गंभीर दखल प्रशासनाकडून घेण्यात आली होती. वास्तविक धान्य विकणारे रेशन कार्ड धारक आणि खरेदी करणारे व्यापारी यांच्यावर कारवाई करणे गरजेचे होते.
शासनाकडून रेशनवर 12 किलो तांदूळ, 8 किलो गहू मोफत दिला जात आहे. काही कार्डधारक हे धान्य आठवडा बाजारात व्यापार्यांना विकत असल्याचे समोर आले होते. परिणामी गरजू रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही, अशा आशयाचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलूके, पुरवठा निरीक्षक राजू कदम, शिवाजी लांडे, वाळवा तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी अविनाश मोरे यांच्यासह पथकाने वाळवा येथे भेट देऊन रेशन दुकानांची तपासणी केली.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलूके म्हणाले, रेशन कार्ड धारकांंना मिळालेले धान्य कोणालाही विकता येणार नाही. हे धान्य गरजू, गरीब लोकांसाठी आहे. ज्यांना गरज नाही, त्यांनी ते घेऊ नये. यासाठी शासन सर्वेक्षण करत आहे. यावेळी पुरवठा विभागाच्या पथकाने धान्य नेणार्या कार्ड धारकांची भेट घेऊन जबाब नोंदविले. तसेच रेशन दुकानांमधील धान्यसाठा तपासला आणि दुकानदारांना सूचना केल्या.
सरपंच संदेश कांबळे म्हणाले, रेशनवर मिळणारे धान्य कोणीही विकू नये. गरज नसेल तर घेऊ नये. तसेच व्यापार्यांनीही रेशनवरील धान्य खरेदी करू नये. यापुढे आठवडा बाजारात फिरून पुरवठा विभागाच्या पथकाकडून चौकशी करू, तसा ठराव मासिक सभेत केला जाईल.