

वारणावती : सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या जैवविविधतेत आणखी एका दुर्मीळ पक्ष्याची भर पडली आहे. श्रीलंकन फ्रॉगमाऊथ या वैशिष्ट्यपूर्ण आणि निशाचर पक्ष्याचे चांदोलीच्या जंगलात प्रथमच दर्शन घडले आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून सुरू असलेल्या शोधमोहिमेला अखेर यश आले असून, पक्ष्याचे प्रत्यक्ष निरीक्षण, नर-मादीच्या आवाजाची नोंद आणि छायाचित्रण करण्यात पक्षी अभ्यासकांना यश मिळाले आहे.
चांदोली बर्डविंग इको टुरिझमचे संस्थापक व निसर्ग अभ्यासक प्रणव महाजन आणि वन्यजीव छायाचित्रकार शिवम खाडे हे जंगलात पक्षी निरीक्षण करत असताना ही महत्त्वपूर्ण नोंद झाली. याबाबत प्रणव महाजन यांनी सांगितले की, चांदोली परिसरात या पक्ष्याचे अस्तित्व असावे, असा अंदाज अनेक वर्षांपासून होता. आंबा आणि कोयना जंगल परिसरात यापूर्वी त्याच्या नोंदी झाल्या होत्या. मात्र, चांदोलीत त्याचे प्रत्यक्ष दर्शन किंवा अधिकृत नोंद झाली नव्हती. त्यामुळे गेल्या सात-आठ वर्षांपासून या पक्ष्याचा शोध सुरू होता.
ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात पक्षी निरीक्षणादरम्यान अचानक पावसाने हजेरी लावली. पाऊस थांबल्यानंतर अंधार पडू लागल्याने दोघे परतीच्या मार्गावर होते. आवाजाची ओळख पटवली असता, तो श्रीलंकन फ्रॉगमाऊथचा असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, यावेळी नर आणि मादी या दोघांच्याही आवाजांची नोंद घेता आली.
आवाज ऐकू येत असूनही पक्षी नजरेस पडत नसल्याने काही काळ प्रतीक्षा करण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन जवळपास तासभर बारकाईने निरीक्षण केले. अखेर झाडांच्या फांद्यांमध्ये लपलेला हा दुर्मीळ पक्षी दिसून आला. त्याचे छायाचित्र टिपण्याची संधीही मिळाली. या परिसरात फ्रॉगमाऊथच्या दोनपेक्षा अधिक जोड्या असण्याची शक्यता महाजन यांनी व्यक्त केली.
श्रीलंकन फ्रॉगमाऊथ हा साधारण २२ ते २३ सेंटिमीटर लांबीचा निशाचर पक्षी आहे. रात्री खाद्याच्या शोधात बाहेर पडणारा हा पक्षी दिवसा घनदाट सदाहरित जंगलातील झाडांवर विश्रांती घेतो. त्याच्या शरीराचा रंग आणि ठेवण यामुळे तो झाडांच्या सुकलेल्या फांद्या किंवा सालींमध्ये सहज मिसळून जातो. नराचा रंग राखाडी, तर मादीचा रंग बदामी असतो. मादीच्या पंखांच्या मागील बाजूस पांढरे ठिपकेही दिसतात. बेडकाच्या तोंडासारखी रुंद चोच असल्याने त्याला फ्रॉगमाऊथ असे नाव पडले असून, मराठीत त्याला 'मंडूकमुखी' असेही संबोधले जाते.