सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मीळ काळ्या रानकुत्र्याचे दर्शन

वन खात्याचा दुजोरा ः कराडमधील पर्यटकाने घेतले छायाचित्र
black wild dog
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मीळ काळ्या रानकुत्र्याचे दर्शन
Published on
Updated on
आष्पाक आत्तार

वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुमीर्र्ळ अशा काळ्या रानकुत्र्याचे (मेलेनिस्टिक) दर्शन नुकतेच झाले आहे. बफर झोनमधील एका गावात फिरण्यास गेलेले कराड येथील पर्यटक दिग्विजय पाटील यांना हा रानकुत्रा दिसला. त्यांनी तो मोबाईलमध्ये टिपला. त्यांनी ही माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहायक वन संरक्षक अमित भिसे यांनी सदर परिसरात कॅमेरा लावून अधिक माहिती व अभ्यास करण्याच्या सूचना वनरक्षकांना दिल्या आहेत. वन विभागाच्या नोंदीनुसार 1936 मध्ये तमिळनाडूतील कोइम्बतूर वन विभागातील गड्डेसल येथे शिकारी, निसर्गशास्त्रज्ञ कॉफी प्लांटर आणि स्कॉट्समन आर. सी. मॉरिस यांनी एका काळ्या रानकुत्र्याची (मेलेनिस्टिक) नोंद केली होती.

रानकुत्रा / कोळशिंदा (वाईल्ड डॉग) शास्त्रीय नाव : (कुओन अल्पिनुस)

हा रंगाने तांबूस लालसर असतो. रानकुत्र्याचे कान टोकाकडे गोलाकार असतात. हनुवटीखालचा भाग पांढरट असतो. रानकुत्र्याच्या शेपटीचा टोकाकडील बहुतांश भाग हा काळसर असतो. रानकुत्र्याची उंची 43 ते 45 से.मी.पर्यंत असते. शरीराची लांबी तीन फुटापर्यंत असते. नराचे वजन 20 किलोच्या आसपास असून मादीचे वजन नरापेक्षा कमी असते.

कळपाने राहणार्‍या या प्राण्याचे वास्तव्य जंगलात असते. रानकुत्री कळपाने शिकार करतात. त्यामुळे त्यांना मोठ्या व ताकदवर प्राण्याची शिकार करण्यास मदत होते. हरीण वर्गातील प्राणी हे त्यांचे आवडीचे खाद्य. कळपातील प्राण्यांची संख्या जास्त असल्यास ते गव्यासारख्या मोठ्या प्राण्याचीही शिकार करतात. जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान या कुत्र्यांची पिले बघावयास मिळतात. मादी एकावेळी 4 ते 6 पिलांना जन्म देते. पर्यटक दिग्विजय पाटील यांना दिसलेला हा रानकुत्रा संपूर्ण काळा आहे.

जीवशास्त्रात मेलेनिस्टिक म्हणजे अशी स्थिती, जिथे एखाद्या प्राण्यामध्ये मेलेनिन या रंगद्रव्याचे असामान्यपणे जास्त प्रमाण असते. ज्यामुळे त्याचा रंग नेहमीपेक्षा जास्त गडद होतो. बहुतेकदा काळा. सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांसह विविध प्रजातींमध्ये हा अनुवंशिक फरक दिसून येतो. जिथे ते काळे फर, पंख किंवा त्वचेच्या स्वरूपात प्रकट होऊ शकते. यापूर्वी काळा बिबट्या सह्याद्रीमध्ये नोंद झाला आहे. ही नवीन नोंद सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता दाखवून देते.
रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news