सांगली : जिल्ह्यात रामनवमी भक्तिभावात साजरी

प्रवचन, कीर्तनाने मार्गदर्शन; जन्मकाळावेळी पुष्पवृष्टी; मिरजेत आरोग्यमंत्र्यांनी घेतले दर्शन
Sangli News
सांगली जिल्ह्यात रामनवमी भक्तिभावात साजरी
Published on
Updated on

सांगली : जिल्ह्यात विविध ठिकाणी रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. ‘राम जन्मला गं सखी, राम जन्मला’च्या गजरात जत येथील पौराणिक प्रभू श्रीराम मंदिरात श्रीरामनवमीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीमंत इंद्रजित ऊर्फ बाबाराजे डफळे व श्रीमंत उर्वशीराजे डफळे व परिवाराच्या प्रमुख उपस्थितीत हा जन्मोत्सव कार्यक्रम पार पडला. जत येथील संस्थानकालीन जुन्या राजवाड्यासमोर हेमाडपंथी पौराणिक श्रीराम मंदिर असून श्रीमंत डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान आहे. श्रीमंत डफळे सरकार यांनी अलीकडेच या सभामंडपाचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील गाभार्‍यात असलेल्या प्रभू श्रीराम, श्रीलक्ष्मण, माता जानकीदेवी, भरत, शत्रुघ्न व लवर-कुश यांच्या आकर्षक संगमरवरी मूर्ती. मूर्तीस अभ्यंगस्नान घालून त्यांची विधिवत अभिषेक पूजा करण्यात आली. सकाळी श्रीरामाची सालंकृत पूजा करण्यात आली. श्रीरामलल्लाची पालखी पारंपरिक वाद्यांच्या निनादात श्रीधर पोतदार यांच्या घरापासून निघून ती कालिकादेवी मंदिराजवळून राम मंदिरात आणण्यात आली. सकाळी सुरेश चव्हाण व सहकारी यांचा भजनाचा, कीर्तनकार गिरीश बुवा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सवानिमित्त प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीवर डफळे राजघराण्याचे सदस्य श्रीमंत इंद्रजित ऊर्फ बाबाराजे डफळे, श्रीमंत उर्वशीराजे डफळे व परिवाराच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर भाविक-भक्तांनी पुष्पवर्षाव केला.

राजारामबापू कारखाना कार्यस्थळ इस्लामपूर ः राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील राम मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्याहस्ते आरती करण्यात आली. संपूर्ण मंदिर फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. स्वागतकमान, भव्य रांगोळी आणि मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कीर्तनकार दादा महाराज येलूरकर यांचे कीर्तन झाले. प्रा. डॉ. योजना शिंदे-पाटील व भगिनींच्या साथीने जन्मोत्सवाचा पाळणा घेण्यात आला. आ. जयंत पाटील यांच्याहस्ते आरती करून भाविकांना सुंठवडा व प्रसाद वाटप करण्यात आला. प्रा. शामराव पाटील, विनायक पाटील, बाळासाहेब पाटील, सुस्मिता जाधव, प्रदीपकुमार पाटील, शशिकांत पाटील, संग्राम फडतरे, उदय पाटील, शंकरराव भोसले, सुहास पाटील, माजी सभापती शैलजा पाटील, सर्जेराव देशमुख, लालासाहेब वाटेगावकर उपस्थित होते. कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले.

श्रीरामनवमीनिमित्त संवादसत्र

देशिंग : संस्कार मंच - कुटुंब प्रबोधन मंचतर्फे श्रीरामनवमीनिमित्त मळणगावमध्ये प्रबोधन व संवादसत्र झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारप्रमुख ईश्वर रायण्णावर यांनी मार्गदर्शन केले.

आटपाडीत रामनवमी

आटपाडी : येथील ब्राम्हण गल्लीतील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर यांनी स्थापन केलेल्या राम मंदिरात गुढीपाडव्यापासून दररोज सायंकाळी श्रीराम भजनी मंडळाची 5 ते 7 भजन सेवा आणि 7 ते 7.30 रामरक्षापठण करण्यात आले. श्री रामनवमीदिवशी सकाळी श्रीरामास अभिषेक करण्यात आला. दुपारी बारा वाजता भाविकांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव सोहळा झाला.

बहे रामलिंग बेट

बहे ः येथील श्री रामलिंग बेटावर टाळ, मृदंगाच्या गजरात श्रीरामाच्या जयघोषात धार्मिक व भक्तिपूर्ण वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मकाळ साजरा करण्यात आला. पहाटे अभिषेक, पूजा, आरती करण्यात आली. न्यायाधीश मदन गोसावी (महाराज) यांनी कीर्तन केले. बहे येथील भजनी मंडळाने साथ दिली. दुपारी 12.30 वा. सभामंडपात मध्यभागी बांधण्यात आलेल्या पाळण्यावर भाविकांनी पुष्पवृष्टी केली. रामजन्मकाळ उत्साहात साजरा करण्यात आला. आरतीनंतर महिलांनी पाळणा म्हटला. प्रसाद पाटील व संजय साळुंखे परिवाराने महाप्रसादाचे आयोजन केले होते. तीर्थक्षेत्र रामलिंग बेट देवस्थान समिती, ह.भ.प. लखन कोकीळ महाराज, रवींद्र बडवे, अशोक बडवे, प्रा. मकरंद बडवे, अधिक बडवे, प्रथमेश बडवे, अपूर्व बडवे, अथर्व बडवे, अनुज बडवे, तसेच विश्वस्त बडवे-पुजारी यांनी संयोजन केले.

‘दीनदयाळ’ कार्यस्थळ

इस्लामपूर ः येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी कार्यस्थळावर रामनवमी व कार्यस्थळावरील गणेश मंदिराचा 19 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. संचालक सुमंत महाजन व सुखदा महाजन यांच्याहस्ते गणेश मंदिरात विधिवत पूजा, अभिषेक व आरती झाली. डॉ. अण्णासाहेब डांगे, अशोकराव देसाई उपस्थित होते. बजरंग कदम यांनी स्वागत केले. आदित्य यादव, संजय कुशिरे, प्रशांत जाधव, विजय कवठेकर, सुरेश पाटील यांनी संयोजन केले.

मिरजेत विविध कार्यक्रम

मिरज : शहरातील विविध राम मंदिरांमध्ये रामनवमी उत्साहात पार पडली. त्यानिमित्ताने अन्नदानासह विविध कार्यक्रम पार पडले. येथील साईनंदन कॉलनीमध्ये सकाळी वैशाली जोगळेकर यांचे सुश्राव्य भजन झाले. स्त्रीशक्ती नवरात्र उत्सव मंडळातर्फे आरती करण्यात आली. गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे व माजी नगरसेविका अनिता वनखंडे यांनी संयोजन केले. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंदिरास भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी माजी नगरसेवक दिगंबर जाधव, सागर वनखंडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. येथील गोठण गल्ली येथील श्रीराम मंदिरामध्ये विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

शिराळा पंचायतन मंदिर

शिराळा शहर : येथील श्रीराम पंचायतन मंदिरात श्री रामनवमी भक्तिभावात साजरी करण्यात आली. विश्वस्त वासुदेव हसबनीस यांनी विधिवत पूजा केली. ही श्रीराम मूर्ती समर्थ रामदास स्वामी यांनी चारशे वर्षांपूर्वी हसबनीस कुटुंबीयांना दिली आहे. त्याचे अजूनही जतन केले जाते. दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी होऊन जन्मकाळ साजरा झाला. नागेश जोशी यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. मकरंद जोशी, मयूर जोशी, शीतल जोशी यांच्या साथीत भजनही झाले. नियोजन दत्त गणेश मंडळाने केले. यावेळी कौशिक हसबनीस, संतोष देशपांडे, उमेश कुलकर्णी उपस्थित होते. गोपालकृष्ण पथ येथील पुरातन राम मंदिरातही रामजन्मोत्सव उत्साहात झाला. उगार खुर्दचे काणेबुवा यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. आ. सत्यजित देशमुख यांनी येथे भेट दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news