Sangli leopard attack : लाडक्या ‌‘बाबू‌’च्या विरहाने माता-पित्याचा टाहो

आई दीपालींची आर्त हाक ः चिमुकल्या राजवीरच्या मृत्यूने परिसर हळहळला
Sangli leopard attack
Sangli leopard attack
Published on
Updated on

शिराळा शहर : अ अ आईचा ही बाराखडी तो शिकत होता.. अंगणवाडीत छोट्या गटात त्याने आईपासूनच शिकायला सुरुवात केली होती.. आपल्या बोबड्या बोलांनी बालचमूंना हसवणाऱ्या चिमुकल्या राजवीर हणमंत पाटील (वय 6) याचा बिबट्याच्या हल्ल्यात अंत झाला. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या भीषण घटनेमुळे बिऊर गावावर शोककळा पसरली आहे. निसर्गाच्या या क्रूर नियतीपुढे संपूर्ण गाव हतबल झाला आहे. अंगणवाडीतील बालचमू निरागस नजरेने व्याकुळ आहेत.. आई दीपाली आणि वडील हणमंत बोलण्याच्या स्थितीत नाहीत..

राजवीरला घरात सर्वजण लाडाने बाबू म्हणत. शुक्रवारी सायंकाळी तो आपली चार वर्षांची लहान बहीण कार्तिकीसोबत घराबाहेर खेळत होता. याच वेळी शेजारील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने राजवीरवर झडप घातली. बिबट्याने त्याचा गळा पकडून घराच्या उत्तरेकडे सुमारे 500 मीटर अंतरावरील शेतात फरफटत नेले. कार्तिकीने प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने ग्रामस्थ धावून आले. नागरिकांचा वाढता दबाव पाहून बिबट्याने राजवीरला शेतात सोडून झुडपात धूम ठोकली, मात्र तोपर्यंत राजवीरची प्राणज्योत मालवली होती.

काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

हणमंत आणि दीपाली पाटील या दाम्पत्याला राजवीर आणि कार्तिकी अशी दोन मुले. वडील खासगी नोकरी आणि शेती करून कुटुंबाचा गाडा ओढत आहेत. माझा बाबू कुठे गेला? असे विचारत आई दीपाली वारंवार बेशुद्ध पडत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडील हणमंत यांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज फाडणारा आहे. आईच्या ‌‘माझा बाबू मला परत आणून द्याल का?‌’ या प्रश्नाचे उत्तर आज कुणाकडेही नाही.

प्रशासकीय सोपस्कार व प्रश्नचिन्ह

घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी भेट देऊन पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण केले आहेत. नियमानुसार शासनाकडून आर्थिक मदतही जाहीर होईल, मात्र एका निरागस बालकाचा जीव गेल्याने गावातील तरुणांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप आहे. अंगणवाडीतील राजवीरचे छोटे मित्रही आपल्या या सोबत्याच्या जाण्याने व्याकुळ झाले असून, संपूर्ण परिसरात भयाण शांतता पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news