

इस्लामपूर : कारखानदार काटामारी करत आहेत हे मुख्यमंत्र्यांना आधीपासून माहीत आहे, तर आतापर्यंत तुम्ही त्यांना ब्लॅकमेल करत होता काय? हिम्मत असेल तर त्यांची नावे जाहीर करून कारवाई करावी. फडणवीस सरकार पूरग्रस्तांच्या नावाखाली ऊस उत्पादकांचे पैसे घेऊन दलाली करत आहे. पूरग्रस्तांना दिलेले पॅकेज फसवे आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खा. राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार बैठकीत माजी खा. शेट्टी बोलत होते. यावेळी भागवत जाधव उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दि. 16 ऑक्टोबर रोजी 24 वी ऊस परिषद जयसिंगपूर येथे होणार आहे. या परिषदेत शेतकर्यांच्या विविध मागण्या घेण्यात येणार आहेत. कारखानदारांची एकरकमी एफआरपी द्यावी, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. आता साखर संघाने सर्व कारखानदारांना एकरकमी एफआरपीचे आदेश द्यावेत.
शेट्टी म्हणाले, यावर्षी 80 ते 85 दिवस गळीत हंगाम सुरू राहील की नाही याची शाश्वती नाही. प्रत्येक कारखानदाराने गाळप क्षमता वाढवली आहे. एकीकडे कारखान्याकडे ऊस उत्पादकांना देण्यासाठी पैसे नाहीत, तर दुसरीकडे कारखान्यांचे विस्तारीकरण कसे सुरू आहे, याचे उत्तर द्यावे. राज्यात गोवंशबंदी कायद्यामुळे भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कायद्यात बदल करावा लागणार आहे. अध्यादेश काढून भाकड जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा. शेतकर्यांना एकरकमी ऊस बिल मिळण्यासाठी कोर्टात जावे लागते. शेतकर्यांच्या विरोधात जर साखर संघ कोर्टात जात असेल, तर साखर संघाला शेतकरी येथून पुढे वर्गणी देणार नाहीत.