शेतकर्‍यांच्या थडग्यावर ताजमहाल नको

राजू शेट्टींचा इशारा; ‘शक्तिपीठ’विरुध्द बुधवारी मुंबईत धडक मोर्चा
Raju Shetty
राजू शेट्टी
Published on
Updated on

सांगली : शक्तिपीठ महामार्ग हाच एक मोठा घोटाळा आहे. हा मार्ग भक्तांसाठी नाही, तर तो त्या त्या मतदारसंघातील राज्यकर्ते, शासकीय अधिकारी आणि ठेकेदारांना पोसण्याचा मार्ग आहे. यासाठीच शेतकर्‍यांतही जाणीवपूर्वक संभ्रम तयार करण्यात येत आहेत. शेतकर्‍यांच्या थडग्यावर तुमचे ताजमहाल बांधू नका, असा सणसणीत इशारा देत, या महामार्गाविरुध्द राज्यातील बारा जिल्ह्यांतील शेतकर्‍यांचा बुधवारी 12 मार्चरोजी मुंबईत धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग हा मोठा घोटाळा आहे. या महामार्गावर जी फळझाडे होती, त्याचे मूल्यांकन करताना शंभर कोटींचे हजार कोटी केल्याचे उघड झाले आणि संबंधितांवर गुन्हेही दाखल झाले. हे हिमनगाचे टोक आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी असलेला 86 हजार कोटीचा खर्च आणखी दीड लाख कोटीवर जाईल, अशी माहिती राष्ट्रीय मार्ग प्राधिकरणातूनच मिळते. समृध्दी महामार्गाच्या तुलनेत केवळ 40 टक्के रक्कम जमीन हस्तांतरासाठी जाणार आहे, हीच खरी गोम आहे. मुळात या महामार्गाची खरच गरज आहे का, हाही सवालच आहे. प्रचलित रस्ते खूप चांगले असताना, त्यावर टोल नसताना, कसलीही वर्दळ नसताना हा महामार्ग कशासाठी?

महामार्गात ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना पैसे वाढवून देणार, असा संभ्रम तयार केला जात असला तरी, हे धादांत खोटे आहे. पोलिस बंदोबस्तात मोजणी सुरू आहे. त्याचे गुणांकनही कमी केले आहे. व्यवहारात चांगल्या जमिनीचा दर एकरी 40-45 लाख असताना, एकराला दोन-दोन कोटी मिळणार, अशी हूल उठवली आहे. त्याला शेतकरीही बळी पडत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे, संदीप राजोबा, उमेश देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरांना पुराचा धोका

महामार्गामुळे तयार होणारे प्रश्न केवळ शेतकर्‍यांपुरते मर्यादित नाहीत, तर महामार्गातील शहरांनाही त्याचा धोका आहे. औदुंबर-आदमापूर या 72 किलोमीटर पट्ट्यात सहा नद्या आहेत. महापुरात त्या पात्राबाहेर तीन-तीन किलोमीटर पसरतात. त्यात आता महामार्गासाठी टाकलेला भराव म्हणजे एकप्रकारचे धरणच आहे. त्यामुळे आता हे पुराचे पाणी या विस्तारित भागात 40-40 दिवस रेंगाळेल, त्याचे काय? वड्डी, म्हैसाळमध्ये शिरलेले पाणी, हा याचा पुरावा आहे. माणगाव, पट्टणकोडोली भागात भराव पडला, तर पाणी बिंदू चौकात येईल. महामार्गाच्या भरावामुळे सांगलीतही विश्रामबाग परिसरात पाणी येईल. वाळवा-कराड शहरातही पाणी शिरेल, असा धोका शेट्टी यांनी व्यक्त केला.

कोटींचा काटा

महामार्ग खासगीकरणातून आणि पैसा टोलच्या रूपातून असा हा सारा खेळ आहे. ज्यांच्या मतदारसंघातून हा महामार्ग जातो, ते नेते, ठेकेदार आणि अधिकारी यांचा काटा कोटींच्या घरात जाईल, असा आरोप शेट्टी यांनी केला. हाच रस्ता इमानदारीने केला असता, तर खर्च वाचला असता आणि तो खर्च भाविकांच्या बोकांडी बसला नसता, असेही त्यांनी सांगितले.

पहिली बैठक महामार्गाची

फडणवीस-शिंदे यांना हा महामार्ग पाहिजेच आहे. फडणवीस यांनी तर मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिली बैठक शक्तिपीठ महामार्गाचीच घेतली होती, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

गैरसमज काढून टाका

802 किलोमीटरच्या या महामार्गाला फक्त 20 कनेक्शन्स आहेत. रस्त्याला कंपाऊंड असल्याने कडेला कसलेही व्यवसाय करता येणार नाहीत. त्यामुळे शेजार्‍याच्या शेतातून रस्ता गेला, तर माझ्या जमिनीची किंमत वाढेल, हा गैरसमज आहे, असे स्पष्ट मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news