‌Raju Shetti: ‘शक्तिपीठ‌’ मोजणीस येणाऱ्यांना तुडवून हाणा

माजी खासदार राजू शेट्टी : प्रस्तावित महामार्गाविरोधात ईश्वरपूर तहसीलवर सर्वपक्षीय मोर्चा
‌Raju Shetti
‌Raju Shetti: ‘शक्तिपीठ‌’ मोजणीस येणाऱ्यांना तुडवून हाणाPudhari
Published on
Updated on

ईश्वरपूर : नागपूर-गोवा शक्तिपीठ रस्त्यासाठी डोंगराएवढे भराव टाकल्याने गावांना, शहरांना महापूरचा धोका वाढणार आहे. शेतात 4-5 महिने पाणी साठून राहिल्याने शेती, शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. ‌‘शक्तिपीठ‌’साठी 65 हजार कोटी रुपयांचा जादा खर्च दाखवला आहे. रस्त्याच्या प्रक्रियेत कमालीची गुप्तता पाळली आहे. आता, रस्त्यासाठी जमिनी मोजणीकरता कोणी आले तर त्यांना तुडवून हाणा, असे आवाहन माजी खा. राजू शेट्टी यांनी केले.

‌‘शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा‌’ या मागणीसाठी ईश्वरपूर तहसील कार्यालयावर माजी खा. राजू शेट्टी, भारत पाटणकर, धनाजी गुरव आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. श्रमिक मुक्ती दल, मराठा क्रांती मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस (श. प), शिवसेना (उबाठा), स्वाभिमानी शेतकरी संघटना, दलित महासंघ, प्रहार संघटना, बळीराजा शेतकरी संघटना आदी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त, शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. मागण्याचे निवेदन तहसीलदार सारिका रासकर यांना देण्यात आले.

सकाळी 11 वाजता पंचायत समिती आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील, राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा कामेरी नाका, आझाद चौक, गांधी चौक, यल्लमा चौक यामार्गे तहसील कार्यालयावर आला. तेथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गासाठी 124 कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च आहे. इतर रस्त्यांची तुलना करता 65 हजार कोटी रुपये अधिक खर्च दाखवला आहे. सरकारला जादा पैशातून 2029 ची निवडणूक लढवायची आहे. मतासाठी 5 ते 7 हजार रुपयेदेखील वाटले जातील.

ते म्हणाले, रस्त्याच्या भरावाने 20 ते 25 फुटांपर्यंत रस्ता उंच होणार आहे. परिणामी पावसाचे पाणी 4-5 महिने शेतात साचणार आहे. शेती नापीक होणार आहे. सुमारे 800 किलोमीटरच्या रस्त्यावर कडेने जाळी मारली जाणार आहे. 26 ठिकाणीच वाहनांना बाहेर पडता येणार आहे. त्यामुळे उद्योगधंद्याला फटका बसणार आहे. पावसाळ्यात सांगली जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, शाहूवाडी, तर पाणी तुंबल्याने सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यालाही महापुराचा मोठा फटका बसणार आहे. शक्तिपीठवर वाहनांकडून टोल वसूल करून खंडणी गोळा केली जाणार आहे. या लढ्यात कोल्हापूर जिल्हा वाळवा तालुक्याबरोबर आहे.

भारत पाटणकर म्हणाले, बंदुकीची गोळी झेलावी लागली तरी हे आंदोलन सोडायचे नाही, अशी तयारी ठेवली पाहिजे. कोल्हापुरातील आंदोलनकर्त्यांनी ताकदीने काही ठिकाणावरून हा मार्ग रद्द केला. तेथे तीव्र विरोध झाला म्हणूनच हा मार्ग वाळवा तालुक्यातून घेतला आहे. सरकारला प्रतिसरकारचे पाणी दाखवून दिले पाहिजे. आंदोलनासाठी माणसे एकत्र करून ताकद दाखवली पाहिजे. गावोगावी उठाव करून मोठी लढाई उभी करू. रस्त्यासाठी मोजणीला आला की तंगडीच मोडली जाईल, अशी भीती वाटली पाहिजे, अशी दहशत करू.

धनाजी गुरव म्हणाले, पर्यायी रस्ता असताना ‌‘शक्तिपीठ‌’ कशासाठी रेटला जात आहे. हा निर्णय अव्यवहार्य आहे. सरकारला शाळा, दवाखाने बंद करून कर्जावर रस्ता करायची गरजच काय आहे? हा मार्ग गावे जोडणारा नसून गावे गाडणारा आहे. हा रस्ता अदानी, अंबानी या उद्योगपतीसाठी आहे. रस्ता करताना शेतकऱ्यांना विचारात घेतले नाही. विधिमंडळ, स्थानिक स्वराज संस्थांना विचारात घेतले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हुकुमशाही पध्दतीने निर्णय घेतला आहे. शक्तिपीठविरोधात गावोगावी करून ठराव या विनाशकारी प्रकल्पाविरोधात आंदोलन करू.

बी. जी. पाटील म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग उद्योग, शेती उद्ध्वस्त करणारा आहे. 2019 च्या महापुरात सांगलीत धोक्याची पातळी 55 मीटरपर्यंत गेली होती. याचा फटका 106 गावांना बसला होता. नव्या भरावाने ही पातळी 65 मीटरपेक्षा वर जाणार आहे. त्यामुळे अनेक गावे पाण्यखाली जातील. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे दिग्विजय पाटील, शिवसेना (उबाठा)चे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शहाजी पाटील, सुश्मिता जाधव, राजवीर पाटील (येडेनिपाणी), शामराव पाटील (इटकरे) आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी (श. प.) जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, स्वाभिमानीचे भागवत जाधव, भास्कर कदम, दीपक कोठाकळे, उमेश कुरळकर, प्रवीण पाटील, बाळासाहेब पाटील, संग्राम जाधव, संग्राम फडतरे, शिवाजी पाटील, छाया पाटील, अनिल पाटील यांच्यासह बाधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news