

सांगली : कोल्हापूरच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही तत्काळ ऊस दर जाहीर करावा. यासाठी दोन दिवसांची मुदत देत असून, तसे न झाल्यास जिल्ह्यातील कारखान्यांची धुराडी बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे नेते संदीप राजोबा उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, कोल्हापुरात शासनाच्या वतीने मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमच्याशी चर्चा करून ऊस दर निश्चित केला. यासाठी पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी टोल नाक्यावर स्वाभिमानीने सलग ६२ तास रास्ता रोको आंदोलन केले. आता कोल्हापूर पॅटर्ननुसार सांगलीतील कारखान्यांनीही दर जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे. त्याला अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
कोल्हापूर पॅटर्ननुसार विनाकपात पहिली उचल ३९०० रुपये, कारखाना बंद होताना १०० रुपये आणि निर्धारित दराच्या अनुषंगाने आणखी २०० रुपये, अशी एकूण ४२०० रुपये प्रतिटन दराची तरतूद आहे. हाच दर सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील कारखान्यांनीही द्यावा. ईश्वरपूर येथे सांगलीतील काही कारखानदारांशी हंगाम सुरू होण्यापूर्वी अनौपचारीक चर्चा झाली होती. त्यावेळी कोल्हापूरप्रमाणे दर देण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली. बहुतांश कारखानदारांची भूमिकाही सकारात्मक आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःहून दर जाहीर करावा. अन्यथा दोन दिवसांनंतर कारखान्यांचा काटाबंद आंदोलन करण्यात येईल. आमच्या कार्यकर्त्यांनी आमदार जयंत पाटील यांच्याशीही चर्चा केली असून मुंबईहून परतल्यानंतर दोन दिवसांत निर्णय जाहीर करू, असे त्यांनी सांगितले आहे. त्यांची वाट पाहत आहोत.
पाच हजार दर देणाऱ्यांचा जाहीर सत्कार करू...
भाजपप्रणीत काही संघटनांनी पाच हजार रुपये प्रतिटन ऊस दराची मागणी केली आहे. संबंधित कारखानदारांनी त्याची अंमलबजावणी केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना कारखानदारांचा जाहीर सत्कार करेल, अशी टिप्पणीही शेट्टी यांनी केली.