

सांगली : आमची जमीन आम्ही राखण्यासाठी रानात बसायचे का? एकदाच गावात या, शेतकर्यांचे ऐकून घ्या. शेतकर्यांचा नकार मिळाल्यानंतरही वारंवार गावात मोजणीसाठी कशासाठी येता? मोजणीसाठी गावात याल तर याद राखा, असा सज्जड इशारा माजी खा. राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला.
सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी, अंजनी, कवलापूर, माधवनगर आणि पद्माळे या गावांत मोजणी मंगळवारी होती. या सर्व गावांना माजी खा. राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष महेश खराडे, किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉ. उमेश देशमुख यांनी भेटी दिल्या. एकाही गावात मोजणी होऊ दिली नाही. सर्वच गावांतील मोजणी बंद पाडण्यात आली. मणेराजुरी येथे अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने भजन म्हणण्यात आले. याचठिकाणी शेतकर्यांनी आणलेली भाजी-भाकरी सर्वांनी खाल्ली.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, अदानीने गडचिरोली जिल्ह्यात अडीच हजार एकर जंगल खरेदी केले आहे. त्या ठिकाणचे खनिज थेट त्यांच्या गोव्यातील खासगी बंदरात पोहोचवण्यासाठीच हा सारा खटाटोप सुरू आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्गाचा प्रति कि.मी. खर्च 35 कोटी असताना या मार्गाचा मात्र प्रति कि.मी. खर्च 107 कोटी कसा ? असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले, काही बुजगावणी उभी करून विरोध नसल्याचे सांगितले जात असले तरी, 50 हजार कोटीतील काही शिंतोडे आपल्यापर्यंत येतील का? यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. शासकीय कर्मचार्यांनीही मोजणीसाठी जास्त आग्रही राहू नये. शेतकर्यांनी गावात, आम्ही शक्तिपीठसाठी जमीन द्यायची नाही म्हणून सांगितल्यावर सारखे सारखे गावात येऊ नये अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असा इशारा दिला.
महेश खराडे, उमेश देशमुख यांचीही भाषणे झाली. यावेळी प्रभाकर तोडकर , सुनील पवार, रमेश पवार, शरद पवार, राहुल जमदाडे सुरेश करगणे, दत्ताजी पाटील, विकास, पाटील, प्रशांत शिंत्रे, धनाजी पाटील, नवीन पाटील, जोतिराम जाधव आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.