

कडेगाव शहर : मागील 35 वर्षांपासून ऊस पिकासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. रस्त्यावर व न्यायालयीन लढाई जिंकली आहे. कारखानदारांना वठणीवर आणत 250 ते 300 रुपये दर वाढवण्यात यश आले आहे. उसाची लढाई जिंकली आहे. आता काटामारी, रिकव्हरी चोरी यासह आले आणि हळद पिकासाठी संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
कडेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उसाला वाढीव दर मिळवून दिल्याबद्दल माजी खासदार राजू शेट्टी यांचा व पाणी संघर्ष समितीचे प्रमुख डी. एस. देशमुख यांनी टेंभू योजनेच्या परिसरातील 15 कोटींची विविध कामे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडून मंजूर करून घेतल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. स्वाभिमानीचे राज्य प्रवक्तेअनिल पवार, स्वाभिमानीचे संदीप राजोबा, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार, संजय तडसरे, संतोष डांगे उपस्थित होते. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, कारखानदार 3,200 रुपयांच्या वर दर द्यायला तयार नव्हते. आम्ही त्यांना 3,500 ते 3,600 रुपयांच्या पुढे दर द्यायला भाग पाडले. आता ज्या कारखानदारांनी एकरकमी एफआरपी अद्याप दिली नाही, त्यांनी तातडीने द्यावी. अन्यथा, फरकासह रक्कम त्यांनी द्यावी लागेल. एफआरपीचे तुकडे करणाऱ्या कारखानदारांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
पुढे ते म्हणाले, आले पिकाची जून आणि नवीन प्रतवारी करायची नाही, याबाबतचे शासनाला मी परिपत्रक काढायला लावले. शासनाचे परिपत्रक असूनदेखील व्यापारी प्रतवारी करीत शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. हे खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांनी एकजूट ठेवावी. स्वाभिमानीचे राज्य प्रवक्तेअनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली आल्याचा संघर्ष शेतकऱ्यांनी उभा करावा. लागेल तिथे मी सहकार्य करेन. आले व्यापाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू, साखर सम्राटांना वठणीवर आणले आहे. तर आले व्यापारी किस झाड की पत्ती, असा कडक इशारा त्यांनी यावेळी दिला.
संदीप राजोबा म्हणाले, जिल्ह्यातील ज्या साखर कारखानदारांनी एफआरपीचे तुकडे केले आहेत. त्यांनी तातडीने एफआरपी रक्कम पूर्ण शेतकऱ्यांना द्यावी. अन्यथा, त्यांना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शेतकरी धडा शिकवतील. यावेळी स्वाभिमानीचे सत्यभान जाधव, जीवन करकटे, संजय तडसरे यांनी मनोगते व्यक्त केली. संतोष डांगे यांनी प्रस्ताविक केले. यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ नेते युनुस पटेल, सुनील गाढवे, बजरंग अडसूळ, नामदेव रासकर, सिराज पटेल, इम्रान पटेल, शशिकांत रासकर, जगदीश महाडिक, बाळासाहेब वत्रे, शिवलिंग सोनवणे उपस्थित होते.
खोडवा काढणीच्या वेळी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊ नये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढा देऊन सरकारकडून काढून घेतलेल्या एकत्रित, सरसकट आले खरेदीच्या परिपत्रकाप्रमाणेच खरेदी झाली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत जुने-नवीन आले, प्रतवारी, नावाखाली कपात अशी फसवी नाटके चालणार नाहीत. शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेल्या आल्याला न्याय मिळालाच पाहिजे. गरज पडल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना माजी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहील, असा इशारा स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला.