

सांगली ः शक्तिपीठ महामार्गाचे नव्याने रेखांकन करण्यात आले आहे. मात्र या प्रकल्पालाच आमचा ठाम विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार बैठकीत व्यक्त केली. नव्या मार्गामुळे कराड तालुका तसेच वाळवा तालुक्यातील काही गावांना पुराचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी संघटनेचे पदाधिकारी संदीप राजोबा उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, पूर्वी शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यांतून जाणार होता. या शक्तिपीठमुळे मोठ्या प्रमाणात भराव पडणार होता. त्यामुळे सांगलीसह आसपासच्या गावांना पुराचा धोका होता. त्यामुळे संघर्ष समितीच्यावतीने या विरोधात जोरदार आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामुळे हा मार्ग सांगलीतून हटवण्यात यश मिळाले. मात्र आता नव्याने रेखांकन करताना कराड तालुका आणि वाळवा तालुक्यातील काही गावांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे महापुराला कारणीभूत ठरणारा हा शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.
ते म्हणाले, या प्रकल्पामध्ये तब्बल 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होणार आहे. धार्मिक प्रकल्पाचे नाव पुढे करून रस्त्याच्या कामातून पैसे उकळण्याचा हा उद्योग सुरू आहे. मात्र हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. एका उद्योगपतीच्या खनिज वाहतुकीसाठी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र शेतकरी, सामान्यांच्या जीवावर उठलेल्या सरकारचा डाव कोणत्याही परिस्थिती हाणून पाडू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.