

ईश्वरपूर : ऊस उत्पादक शेतकरी व परिसरातील ग्रामस्थांसाठी योजना राबविल्याबद्दल राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांच्यावतीने 'अवॉर्ड फॉर को-ऑपरेटिव्ह सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इन हाय रिकव्हरी एरिया' या पुरस्काराने कारखान्याचा सन्मान केला जाणार आहे. मंगळवार, दि. २२ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
केंद्र सरकारच्या मुख्य साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने कारखान्याची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. लोकनेते राजारामबापू पाटील आणि माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने ३८ सहकारी पाणीपुरवठा संस्था उभारल्या आहेत. या.शिवाय राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यात १ हजारांहून अधिक बोअरवेल्स मारून पाण्याची सोय केली असून, गावोगावच्या पाणीपुरवठा योजनांना आर्थिक मदत दिली आहे.
याशिवाय कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध शेतीपुरक उपक्रम राबविले जात आहेत. ठिबक सिंचन, सच्छिद्र पाइप निचरा प्रणाली, शेतकऱ्यांच्या बांधावर शुद्ध बियाणे व रोपे, ड्रोनद्वारे औषध फवारणी, मल्टीस्पेक्ट्रम ड्रोन सुविधा आणि राजारामबापू ऊसभूषण पुरस्कार अशा विविध उपक्रमांतून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. कारखान्याच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.