

सांगली : महाराष्ट्र संस्कृतीचे खरे मारक आमदार जयंत पाटील हेच आहेत. राजारामबापू नायक होते, पण जयंत पाटील खलनायक आहेत. त्यांच्या कृत्यांची कुंडली जनतेसमोर मांडणार आहे, अशी टीका भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केली.
पवार म्हणाले, जयंत पाटील यांच्या ‘करेक्ट कार्यक्रम’ नावाचा पापाचा पाढा वाचून दाखवला जाईल. आर. आर. आबांच्या पत्नी व मुलावर दगडफेक करणार्या हातांना कोणाचे बळ होते? वसंतदादांचे वारस राजकीय पटलावरून नेस्तनाबूत झाले पाहिजेत, यासाठी सुडाने पेटलेल्यांची कारस्थाने लोकांसमोर आणू. राजारामबापूंचे सहकारी, दिवंगत नेते नानासाहेब सगरे यांचे पुत्र दिवंगत विजय सगरे यांच्या डोळ्यात पाणी कसे आणले, याची साक्ष मी देणार आहे. जतच्या डफळे कारखान्याच्या व्यवहाराचा हिशेबही मांडला जाईल.
माजी आमदार संभाजी पवार, माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी आमदार व्यंकाप्पा पत्की, विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याबाबत कारस्थाने कोणी केली, हेही मांडणार आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्या आंदोलनात दंगली कशा घडवून आणल्या गेल्या, सांगलीच्या विकासात खोडा कोणी घातला? कवलापूर विमानतळाच्या 165 एकर जागेचा बाजार, सांगली बंधारा पाडण्याचा डाव, निष्पाप तरुणांवर खोटे गुन्हे, या प्रत्येक गोष्टीचा पाढा जनतेसमोर मांडला जाईल.