

विटा; पुढारी वृत्तसेवा : विट्यात शनिवारी (दि. ८) वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसात पडलेली वीज थेट विट्याच्या महसूल भवनावर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
खानापूर तालुक्यात शनिवारी (दि. ८) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे वावटळ सदृश स्थिती तयार झाल्याने सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त होऊन पडल्या होत्या. विटा येथे वीज महसूल विभागाच्या इमारतीवर वीज कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने शेजारी असलेल्या महावितरण कंपनीच्या लोखंडी डीपी आणि ध्वजस्तंभाने हा लोळ खेचून घेतल्याने अनर्थ टळला. वीजेच्या कडकडाटाच्या आवाजाने आणि जाळ, धूर संगटच निघाल्याने लोकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच लेंगरे, गार्डी, घानवड, साळशिंगे सह परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. लेंगरे येथे पाऊस झाल्याने बाजारपेठेत पाणी साचले होते.