

सांगली : जिल्ह्यात आठ दिवसांपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे जूनमध्येच 50 टक्क्याहून अधिक धरणे भरली आहेत. 1 ते 22 जूनदरम्यान 119 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. सरासरीच्या तुलनेत 92.6 टक्के पाऊस बरसला. वारणा नदीची पातळी वाढली आहे. कृष्णा नदीच्या पातळीत चढ-उतार होत आहे. बहे, डिग्रज, सांगली, म्हैसाळ आणि राजापूर (कोल्हापूर) हे बंधारे शनिवारपासून पाण्याखाली आहेत.
मेच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर आठ जूनपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून म्हणजे 22 दिवसात सरासरी 119.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस 92.6 टक्के आहे. वाळवा, तासगाव, कडेगाव, मिरज आदी तालुक्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र आटपाडी, जत तालुक्यात पावसाने सध्या तरी पाठ फिरवली.
सांगली जिल्ह्यात मे महिन्याअखेरपर्यंत जवळपास 25 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू होता. जत आणि आटपाडी तालुक्यात सुमारे 25 गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. गेल्या पंधरा दिवसातील पावसामुळे 22 टँकर बंद करण्यात आले आहेत. सध्या जत तालुक्यातील दोन गावांना तीन टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.