

सचिन सुतार
सांगली : ‘आम्ही मार्ग चालू जिजाऊसुताचे...’ या पंक्तीची जणू प्रचिती देणारी गिरीभ्रमंती म्हणजे रायगड प्रदक्षिणा! जावळीच्या दाट जंगलात वसलेला रायरी पाहताच छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, “गड बहोत चखोट, दौलताबाद पृथ्वीवर चखोट खरा, परंतु उंचीने थोडका, रायगड त्याहुनी दशगुणी उंच, दीड गाव उंच, एकच एक ताशीव धोंड, तख्तास जागा करावा तर हाच गड करावा !” अशा दुर्गम आणि ताशीव बेलाग कड्याकपारीने सजलेला दुर्गराज रायगड भ्रमंतीसाठी तरुणाईला सतत खुणावतो.
रायगड वरच्या बाजूने अनेकदा पाहिला जातो. पण खालून वरती गड चहूबाजूंनी विविध कोनातून बघणे म्हणजे एक पर्वणीच! हिरकणी बुरूज, टकमक टोक, भवानी टोक, वाघ दरवाजा... पूर्वी कधीही न पाहिलेल्या कोनातून गडाचे होत असलेले दर्शन वेगळेच ठरते. सांगली, पुणे, मुंबईतील सत्तरहून अधिक तरुणांनी नुकतीच रायगड प्रदक्षिणा करून याची अनुभूती घेतली.
रायगड प्रदक्षिणेची सुरुवात चित दरवाजाजवळ पहिल्या पायरीवर फुले वाहून झाली. रायगडवाडी रस्त्यावरून थोड्या अंतरावर नाणे दरवाजापासून सुरू होणारा सुमारे चोवीस किलोमीटरचा आडवाटेवरचा प्रवास सकाळी आठ वाजता सुरू केला. सुरुवातीला भातशेतीच्या बांधावरून, वाडी-वस्तीतून जंगलवाटेवरून चालावे लागते. नंतर ही वाट गवत, काटेकुटे, वेली आणि झुडपांमध्ये हरवून गेली होती. पावसाळ्यानंतर या वाटेवरून जाणारी ही पहिलीच तुकडी होती. माहिती असल्याने या तरुणांतीलच दोघेजण कोयत्याने वाटेत येणाऱ्या झुडपांच्या फांद्या छाटत वाट करत होते. चालत असतानाच वाटेवर दिशादर्शनासाठी पूर्वी केलेल्या खुणा शोधायच्या आणि मग पुढे चालायचे. किर्रर्र... झाडीतून चालत पुढे सर्वप्रथम टकमक टोकाखाली पोहोचलो. एरव्ही ज्या ठिकाणी गडावरून खाली बघताना डोळे फिरतात, ते गडावरील ठिकाण खालून वर बघताना नजर थेट आकाशाला भिडते. कडेलोटाची शिक्षा अंमलात आणताना स्वराज्यद्रोही जेथे पडून त्यांचा कपाळमोक्ष होत असे, त्या ठिकाणाहून जाताना मनात किंचित धडधड होती. वाटेतील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी मार्गदर्शक मिलिंद तानवडे हे त्या त्या जागेशी संबंधित ऐतिहासिक घटनांची माहिती देत होते. पुढे विसाव्याच्या ठिकाणी मंदार चौगुले या चिमुकल्याने येथे राजगडाचं मनोगत हे गीत गायिले. यानंतर भारावलेल्या मनानेच खिंड उतरायला सुरुवात केली. खड्या उतरणीवरून खाली उतरताना अनेकवेळा पायाखालील दगडगोटे निसटत होते. काही ठिकाणी अजूनही सुरू असणारे धबधब्यावरील ओहोळ वाहत होते. वाघ दरवाज्ाातून ज्या वाटेने छत्रपती राजाराम महाराज उतरले, ती वाट गडाखालून पाहताना गडाचे ताशीव कडे जणू अंगावर आल्यासारखे दिसतात. स्वराज्याची राजधानी असणारा आणि जेथे ‘शिवसूर्य’ चिरंतर विसावला, त्या दुर्गाच्या अंतरंगीचा ठाव घ्यायचा असेल, तर एकदा रायगड प्रदक्षिणा करायलाचं लागते. पुन्हा एकदा या वाटेवर भ्रमंती करण्याचा मनोमन संकल्प करत फेरीची सांगता झाली.