सांगली : जिल्ह्यात भाजपचे प्राबल्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपने स्वबळावर लढवाव्यात, अशी आग्रही मागणी भाजपच्या जिल्हा कोअर कमिटी बैठकीत करण्यात आली. त्यावर ‘निवडणूक स्वबळावर लढवायची की, महायुती करायची, याबाबत प्रदेशस्तरावर निर्णय होईल. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे’, असे आवाहन भाजपचे नेते, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
सांगलीत भाजप जिल्हा कोअर कमिटीची बुधवारी बैठक झाली. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी जिल्हा व शहर विभागाचा आढावा मांडला. यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, राहुल महाडिक, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, भगवानराव साळुंखे, जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अॅड. स्वाती शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे-पाटील उपस्थित होते.
जिल्ह्यात महायुतीत भाजप हा मोठा पक्ष आहे. महापालिका, जिल्हा परिषद तसेच बहुसंख्य नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये भाजपची सत्ता होती. जिल्ह्यात भाजपचेच प्राबल्य आहे. त्यामुळे भाजपने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात. महायुतीत भाजप हा मोठा भाऊ आहे. जागा वाटपात भाजपला मोठा वाटा मिळाला पाहिजे. त्यात अडचण येत असल्यास भाजपने मैत्रीपूर्ण लढत करावी, अशी भूमिकाही बैठकीत पुढे आली. विखे-पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवा. प्रदेशस्तरावर जो काही निर्णय होईल, तो मान्य करू. जिल्ह्यात भाजपचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी आतापासूनच तयारीला लागा. पक्षातील नव्या व जुन्यांचा मेळ घालून निवडणुकीला सामोरे जाऊ. निवडणुकीत यश मिळवू. भाजपचा मतांचा टक्का वाढला पाहिजे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना होणार आहे. त्यावर सुरुवातीपासून लक्ष ठेवा.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचे दौरे व्हावेत, कार्यकर्त्यांचे मेळावे व्हावेत, असे मत अॅड. स्वाती शिंदे यांनी व्यक्त केले. माजी आमदार भगवानराव साळुंखे, दिनकर पाटील, शिवाजी डोंगरे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्रीराम मंदिर चौकात शंभर फुटी भगवा ध्वज उभारल्याबद्दल भाजप महिला आघाडीच्या नेत्या अॅड. स्वाती शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हेही बैठकीस उपस्थित होते. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याहस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.