

सांगली : 2019 च्या महापूर कालावधीत महापालिकेने खोरी, पाट्या, पंप, मशिनरींसह विविध 34 प्रकारच्या साहित्याची खरेदी केलेली आहे. 1.71 कोटींची ही खरेदी संशयास्पद असल्याचा आरोप माजी नगरसेविका आरती वळवडे यांनी केला आहे. याप्रकरणी 20 जानेवारी रोजी लोकायुक्तांकडे सुनावणी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
त्या म्हणाल्या, महापूर, कोरोना कालावधीत महापालिकेने तातडीची बाब म्हणून 10 कोटी रुपयांहून जास्त रकमेची खरेदी विनानिविदा केली आहे. महापुराच्या काळात झाडू, खराटे, पाट्या, फावडी, ढकलगाड्या, धुरळणी मशिन, सक्शन पाईपसह 34 प्रकारच्या साहित्याची खरेदी 1 कोटी 71 लाख रुपयांना केली आहे. हा खर्च संशयास्पद आहे.
महापूर व कोरोनाच्या काळात तत्कालीन महापालिका प्रशासनाने अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विनानिविदा खरेदीबाबत माहिती देण्यास प्रशासनाने टाळाटाळ केल्याने लोकायुक्तांकडे तक्रार केली. लोकायुक्तांनी सुनावणी लावल्यानंतर महापालिका प्रशासनाने खर्चाची माहिती दिली. तीही केवळ महापुराच्या काळात केलेल्या खरेदीची. कोरोना काळातील खरेदीची माहिती दिली नाही. याबाबत प्रशासनाला पत्र दिल्यानंतर व 20 रोजी लोकायुक्तांसमोर ही बाब निदर्शनास आणणार असल्याचे सांगितल्यानंतर कोरोना कालावधीतील खरेदीची माहिती विभागप्रमुखांकडून संकलित करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे, असे वळवडे यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, महापालिका प्रशासनाने 2019 च्या महापूर व कोराना कालावधीत विनानिविदा केलेल्या खरेदीला नियमानुसार 15 दिवसात स्थायी समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र या खरेदीला साडेचार वर्षांनंतर स्थायीची मान्यता घेण्यात आली. या खरेदीबाबत प्रशासनाकडे माहिती विचारल्यानंतर स्थायी समितीची मान्यता घेण्याचा सोपस्कार पूर्ण केला आहे.
वळवडे म्हणाल्या, 2019 च्या महापूर कालावधीत स्वच्छतेसाठी लागणार्या साहित्याची 1 कोटी 71 लाखांची खरेदी केलेली आहे. झाडू, प्लास्टिक पाट्या, खोरी, काठ्या, मास्क आदी साहित्याचा त्यात समावेश आहे. खराटे दांड्यासह 10 हजार नग 6.50 लाख रुपयांना, तर एक हजार खोरी दांड्यासह 3 लाख 15 हजारांना खरेदी केल्या आहेत. एक हजार पोलादी खुरपी 1 लाख 71 हजार, दहा हजार हॅण्डग्लोव्हज् 40 हजार रुपये, 20 फुटी एक हजार काठ्या 4 लाख 40 हजार रुपये, एक हजार रेनकोट 9 लाख 60 हजार रुपये, 2 हजार साबण 60 हजार रुपये, एक हजार फेसमास्क 40 हजार रुपयांना खरेदी करण्यात आले आहेत. या साहित्यासह अन्य साहित्याचे त्या वेळचे दर पाहता, ही खरेदी संशयास्पद आहे. यात गैरप्रकार झाला असून त्याची चौकशी व्हावी.
महापालिकेने 2019 चा महापूर व कोरोना कालावधीत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची विना निविदा खरेदी केली आहे. यात मोठ्या प्रमाणात स्वच्छतेसाठी व आरोग्य विभागात लागणार्या साहित्य, उपकरणांचा समावेश आहे. स्वच्छतेसाठी खरेदी केलेली खोरी, पाट्या, खुरपे, पहार, फावडे अन्य साहित्य तसेच आरोग्य विभागासाठी घेतलेले व्हेंटिलेटर व अन्य उपकरणे सध्या कोठे आहेत? महपालिकेच्या स्टॉकबुकला त्याची नोंद आहे का? नोंद असेल तरीही प्रत्यक्षात हे साहित्य, उपकरणे महापालिकेकडे आहेत का? असे प्रश्नही आरती वळवडे यांनी उपस्थित केले आहेत.