

सांगली : नदीकाठावरील स्वामी समर्थ घाटावर चैतन्य देवा तोरणे (वय २०) याचा खून केल्याप्रकरणी गुंड लखन इसरडेसह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलिसांनी कृष्णा ऊर्फ मुदक्या कुटनाप्पा कांबळे, करण किशोर शिंदे (दोघे रा. संजय गांधी झोपडपट्टी, भीमनगर, सांगली) आणि महेश विजय नाटेकर (रा. टिंबर एरिया परिसर, सांगली) या तिघांना अटक करून तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. मुख्य सूत्रधार लखन इसरडे, राकेश कांबळे, सुनील ऊर्फ मुक्या निलाप्पा खडते हे तिघे अद्याप पसार आहेत.
चैतन्य तोरणे हा वाढपी म्हणून काम करीत होता. गुंड लखन इसरडे हा गोकुळनगर परिसरात दमदाटी करून लूटमार करत होता. ही माहिती गोकुळनगरमधील महिलांना मिळाल्यानंतर त्यांनी लखनला जाब विचारला. आपली माहिती चैतन्य यानेच महिलांना दिल्याच्या संशयातून इसरडे टोळीचा त्याच्यावर राग होता. चैतन्य मंगळवारी स्वामी समर्थ घाटावर गेला होता. याची माहिती मिळताच संशयितांनी संधी साधून घाटावर धाव घेतली. चैतन्य याच्यावर कोयता आणि चाकूने तोंडावर, पोटावर, डोक्यात सपासप वार केले. अतिरक्तस्त्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले होते. याबाबतची फिर्याद नितीन बाळू ठोकळे (रा. भीमनगर, सांगली) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात दिली.
खुनामध्ये इसरडे टोळीचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आतापर्यंत कृष्णा ऊर्फ मुदक्या कांबळे, करण शिंदे आणि महेश नाटेकर या तिघांना अटक केली आहे. तिघांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. खुनामध्ये तीन अल्पवयीन युवकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांची निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे. पसार असलेल्या लखन इसरडे, राकेश कांबळे, सुनील खडते या तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.