Pune Bengaluru Highway: पेठनाक्यावर ट्रक आडवे लावून महामार्ग रोखला

दंड केल्याच्या रागातून चालकांचे कृत्य; दोन तास वाहतूक कोंडी; दोन चालकांसह ट्रक ताब्यात
Pune Bengaluru Highway
Pune Bengaluru Highway
Published on
Updated on

ईश्वरपूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर पेठनाका (ता. वाळवा) येथे वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून महामार्गावर ट्रक आडवे लावत वाहतूक कोंडी करणाऱ्या दोन ट्रक चालकांवर ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषभ राजू साबळे (वय १९, रा. खारघर, नवी मुंबई) आणि शांतलिंग आप्पाराव होळेकरी (वय २५, रा. निंबाळ, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्या चालकांची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे महामार्गावर सुमारे दोन तास वाहतूक खोळंबली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथील महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पथक गुरुवारी सायंकाळी गस्त घालत होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वाघवाडी फाटा येथे 'नो पार्किंग'मध्ये उभ्या असलेल्या एका ट्रकला (एमएच ४६ डीसी ३२०१) पथकाने ई-चलनाद्वारे ऑनलाइन दंडात्मक कारवाई केली व चालक ऋषभ याला तेथून गाडी काढण्यास सांगितले.

यानंतर काही वेळातच हे पथक पेठनाका उड्डाणपुलाजवळ आले. तेथे शांतलिंग याने आपला ट्रक (क्र. एमएच १२ वाय क्यू ४१३६) वाहतुकीस अडथळा ठरेल असा उभा केला होता. पोलिस त्याच्यावर कारवाई करत असतानाच तेथे ऋषभ ट्रक घेऊन आला आणि ‘माझ्या गाडीवर ऑनलाईन चलन का फाडले?’ असे म्हणत पोलिसांशी हुज्जत घालू लागला.

वाद वाढत गेल्याने ऋषभ आणि शांतलिंग या दोघांनी आपापले ट्रक महामार्गावर थेट आडवे लावून रस्ता रोखून धरला. यामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावर कोल्हापूरकडून कराडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी ईश्वरपूर पोलिस ठाणे व महामार्ग पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवून घेतली. ईश्वरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही संशयित चालकांना वाहनांसह ताब्यात घेतले. याप्रकरणी हवालदार प्रतापराव मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news