

Pune Bengaluru Highway Bus Accident
येडेनिपाणी : पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भरधाव धावणाऱ्या हिरकणी एसटी बसचा टायर फुटल्याने बस रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन धडकली. सुदैवाने बस पलटी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. हा अपघात ११ वाजण्याच्या सुमारास कणेगाव फाट्याजवळ घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आजरा डेपोची हिरकणी एसटी बस (क्र. एमएच १४ केक्यू ९६६४) आजऱ्याहून पुणे स्वारगेटकडे निघाली होती. बस कणेगाव फाट्याजवळ पोहोचली असताना चालकाच्या बाजूचा पुढील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर जाऊन धडकली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि काही काळ आरडाओरडा झाला. मात्र बस पलटी न झाल्याने तसेच समोरच्या लेनमधील कोणत्याही वाहनावर जाऊन न आदळल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
अपघाताची माहिती मिळताच कुरळप पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असली तरी कोणतीही गंभीर जखमी झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.