

सांगली : जागेच्या वादातून बालाजी टायर्स या पंक्चर दुकानाचे मालक शशिकांत ऊर्फ पप्पू शिवाजी धुमाळ (वय ५०, रा. शिंदे मळा) यांचा चाकूने मांडीवर वार करून निर्घृण खून करण्यात आला. गोकुळनगरजवळील रमाई उद्यानासमोर गुरुवार, दि. ६ रोजी दुपारी ही घटना घडली.
संशयित सचिन संतराम होळीकट्टी (रा. गोकुळनगर) याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने हा खून केला. हाणामारीत धुमाळ यांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात सचिन हा देखील गंभीर जखमी झाला असून, धुमाळ यांना वाचवताना त्यांचा मुलगा तेजस हा किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुमाळ यांचे रमाई उद्यानाजवळ पंक्चर काढण्याचे दुकान आहे. दुकानाला लागून असलेल्या शेडमध्ये त्यांचे सासरे राहतात. संशयित होळीकट्टी याचा धुमाळ यांच्या जागेवर डोळा होता आणि ती जागा विक्री करण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत होता. बुधवारी सचिनने धुमाळ यांच्याकडे जाऊन जागेच्या व्यवहाराबाबत बोलणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘मी जागा विकणार नाही; तुला व्यवहार करायचा असल्यास नगरसेवकांशी बोल’, असे धुमाळ यांनी ठणकावून सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला होता.
रिक्षातून येऊन केला हल्ला
गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास धुमाळ हे कुटुंबासह सासऱ्याच्या शेडमध्ये जेवण करत होते. त्यावेळी सचिन हा त्याचा साथीदार संतोष ठोकळ याच्यासह रिक्षातून दुकानासमोर आला आणि त्याने धुमाळ यांना बाहेर बोलावले. त्यामुळे संतापलेले धुमाळ हे कोयत्यासारखे शस्त्र घेऊन बाहेर आले आणि त्यांनी सचिनच्या डोक्यावर वार केला. यावेळी सचिन आणि संतोष ठोकळ यांनी धुमाळ यांच्या पायावर व कमरेजवळ चाकूने खोलवर वार केले. यात मांडीची शीर तुटल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन धुमाळ खाली कोसळले. धुमाळ यांना वाचवण्यासाठी धावलेला त्यांचा मुलगा तेजस हाही हल्ल्यात जखमी झाला. गंभीर जखमी धुमाळ यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र अतिरक्तस्त्रावामुळे वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.