

सांगली : 'आता थांबवायचं कसं', या नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रभावी नाटकाच्या दमदार प्रयोगाने 'पुढारी नाट्योत्सवा'ची रविवारी उत्साहात सुरुवात झाली. यावेळी या नाट्योत्सवाचे मुख्य प्रायोजक मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढी आणि जव्हेरीचे संचालक सिध्दार्थ गाडगीळ यांच्याहस्ते ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने, जान्हवी पणशीकर, आकाश पाटील आणि ऐश्वर्या शेटे या कलाकारांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
आज, मंगळवार, दि. १४ रोजी 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाच्या प्रयोगाने नाट्यमहोत्सवाची सांगता होणार आहे. येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्योत्सवाचे मुख्य प्रायोजक मे. पी. एन. गाडगीळ सराफ आणि जव्हेरी असून 'एलआयसी' आणि येवलेज मिल्क कॉर्नर हे सहयोगी प्रायोजक आहेत. माई ह्युन्दाई, सांगली यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
सोमवारी 'करुणाष्टके' हे नाटक सादर करण्यात आले. गीतांजली कुलकर्णी आणि पर्ण पेठे यांच्या प्रभावी भूमिका असलेले हे नाटक मानवी नातेसंबंध आणि भावविश्व उलगडणारे होते. आज प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या प्रमुख भूमिका या नाटकाचे आकर्षण ठरणार आहे.