

सांगली : गेल्या काही वर्षांत कृष्णा व तिच्या उपनद्यांना अलमट्टी धरणाच्या उंचीमुळे महापूर येत असल्याचा आरोप होत आहे. त्यातच या धरणाची उंची आणखी वाढविण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातलेला आहे. याच्याविरोधात लोकप्रतिनिधी, व्यापारी, शेतकरी यांच्यातर्फे लढा उभारण्यासाठी आमदार अरुण लाड यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत मंगळवारी (दि. 8) सांगलीत बैठक बोलावली आहे. दुपारी दोन वाजता कामगार भवन येथे लोकप्रतिनिधी, इरिगेशन फेडरेशनचे प्रतिनिधी, शेतकरी व सांगलीतील व्यापारी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
याबाबत लाड म्हणाले, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन, अलमट्टी धरणाची उंची 519 वरून 524 मीटर करण्याचे जाहीर केले आहे. केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्याशी तशी चर्चा झाली आहे. यामुळे केंद्राकडूनही त्यास लवकरच मान्यता मिळेल. अलमट्टीची उंची पाच मीटरने वाढवण्याची परवानगी ही आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांवर अन्याय करणारी आहे, असे या राज्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी 2013 च्या लवादाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. महाराष्ट्र राज्यानेही अलमट्टीची उंची वाढविण्यास विरोध करून आव्हान देणे अपेक्षित आहे. ते म्हणाले, 2017, 2019 व 2022 मध्ये आलेल्या महापुरात महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीसह अनेक लहान-मोठी नदीकाठची गावे पाण्याखाली गेल्यामुळे उठवावी लागली होती. अनेक लोकांना, जनावरांना जलसमाधी मिळाली होती. शेती, विद्युत पंपांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. याचे प्रमुख कारण अलमट्टी धरणाच्या पाण्याची (बॅक वॉटरची) फूग हे होते. आता अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवली, तर कल्पनाही करता येणार नाही, एवढे नुकसान होणार आहे.