

सांगली : पुढारी वृत्तसेवा
मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शहरात काढण्यात येणारी मिरवणूक (जुलूस) 16 ऐवजी 19 सप्टेंबरला काढण्याचा निर्णय मुुस्लिम समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. गणेशोत्सवामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सोमवारी शहर पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला. सांगली शहर पोलिस ठाण्यामध्ये मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त समस्त मुस्लिम समाज समिती व अहेले सूनत जमातच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे प्रमुख संजय मोरे, आसिफ बावा, नूर मोहम्मद जमादार, उमर गवंडी, शकील मुल्ला, शहानवाज फकीर उपस्थित होते.
जिल्हा पोलिस प्रशासनाच्यावतीने, पैगंबर जयंतीनिमित्त निघणारा जुलूस सोहळा 16 तारखेला न करता 19 तारखेला काढावा. त्यामुळे दोन्ही समाजाचे सण शांततेत पार पडतील व आपल्यामार्फत एक चांगला संदेश सर्व समाजापर्यंत पोहोचेल, अशी विनंती करण्यात आली. सर्व प्रमुखांनी मान्यता दिल्यानंतर या दिवशीचा जुलूस हा गुरुवार दि. 19 सप्टेंबररोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यादिवशी सकाळी नऊ वाजता बदाम चौकातून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. याची नोंद घेऊन सर्वांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नाझीम अंसारी, सरफराज शेख, अक्रम शेख, रफिक पाशा, नदीम मगदूम, इरफान केडिया आदी उपस्थित होते.
मिरज : पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात येणारा जुलूस अनंतचतुर्दशीच्या एक दिवस आधी म्हणजे दि. 16 रोजी आल्याने अनंतचतुर्दशीची मिरवणूक संपल्यानंतर 19 रोजी काढण्यात येणार आहे. सामाजिक सलोखा वाढविणारा हा निर्णय मिरजेतील मुस्लिम समाजाने घेतला आहे. मिरज शहर जुलूस कमेटीने बैठक घेऊन हा निर्णय घेतला. मुस्लिम समाजातील सर्व मौलवी, मौलाना हाफिज, सर्व राजकीय, सामाजिक संघटनांच्या प्रमुखांनी हा निर्णय घेतला आहे.
19 रोजी सकाळी 8 वाजता मिरजेतील हजरत बाराईमाम दर्गा येथे हजर राहावे. परंपरेप्रमाणे बाराईमाम दर्गा ते शास्त्री चौक, कनवाडकर हौद, बसवेश्वर चौक, मटण मार्केट मार्गे गुरुवार पेठ, किसान चौक मार्गे हजरत ख्वाजा मीरासाहेब दर्गा येथील पटांगणाजवळ जुलूस येईल. तेथे या जुलूसची सांगता होईल, असे सांगण्यात आले आहे.