जयश्री पाटील यांच्यासारखा ‘अन्याय’ आमच्यावर पण करा : पृथ्वीराज पाटील

भाजपा प्रवेशाबाबत उपरोधिक टोला
Prithviraj Patil
पृथ्वीराज पाटील
Published on
Updated on

सांगली : कॉँग्रेस पक्षात अन्याय झाल्याने पक्ष सोडल्याची भूमिका जयश्री पाटील यांनी घेतली आहे. चारवेळा मुख्यमंत्रीपद, केंद्रात मंत्रीपद, आमदार, खासदार, सांगली महापालिकेचे नेतृत्व देऊन काँग्रेस पक्षाने ताईंच्या घराण्यावर जो अन्याय केला, तो फारच मोठा अन्याय आहे. आम्हाला देखील आमदार, खासदार होण्याची इच्छा आहे. काँग्रेस पक्षाने जयश्रीताईंवर जसा अन्याय केला, तसा अन्याय आमच्यावर पण करावा, अशी उपरोधिक टीका कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली.

जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर प्रथमच पृथ्वीराज पाटील यांनी पहिल्यांदाच त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, जयश्री पाटील यांनी भाजपात प्रवेश का केला, कसा झाला, याचा खुलासा दस्तुरखुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच केला आहे आणि तोही त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातच. वसंतदादा बॅँकेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीच हा प्रवेश झाला असल्याचे खुद्द पालकमंत्र्यांनीच स्पष्ट केले. यावर आता अधिक भाष्य करण्याची गरज नाही. पण स्वत: जोखडातून मुक्त होताना सर्वसामान्यांनी तसेच ज्या संस्थांनी विश्वासाने त्या बॅँकेत ठेवी ठेवल्या होत्या, त्या ठेवींची जबाबदारी कोण घेणार? जयश्री पाटील यांनी आता हे पण स्पष्ट करावे. जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे बॅँकेत अडकलेल्या ठेवी संबंधितांना परत मिळाल्या, तर त्यांच्या पक्षप्रवेशाचा सगळ्यांनाच आनंद होईल, असे त्यांनी सांगितले.

जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे कॉँग्रेस पक्ष खिळखिळा झाला असल्याची चर्चा काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. पण त्यात किती तथ्य आहे, त्याचे उत्तर विधानसभेच्या निवडणुकीतच मिळाले आहे. वसंतदादा घराणे त्या निवडणुकीत माझ्याविरोधात मैदानात उतरले होते, पण जयश्री पाटील यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. आता त्या गेल्याने पक्ष खिळखिळा कसा होईल, असा सवाल त्यांनी केला. कॉँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत नसला तरीही महायुतीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीतील आमचे अनेक मित्र मंत्री आहेत. त्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. त्यांच्या माध्यमातून विकासाची कामे करण्यासाठी त्यांना भेटावे लागते. दोनदा निवडणुकीत पराभव झाला असला तरी, मी लढणे थांबवले नाही. आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. अद्याप आघाडीचा निर्णय झाला नाही. आमचे नेते आमदार विश्वजित कदम यांच्याशी चर्चा करून आगामी दिशा ठरवली जाईलच, पण सांगली महापालिकेवर कॉँग्रेसचाच झेंडा फडकेल, असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला.

स्पेस चांगलीच आहे

जयश्री पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आता नवीन स्पेस तयार झाली आहे. नव्या कार्यकर्त्यांच्यादृष्टीने हे चांगलेच झाले आहे. ही स्पेस भरून काढण्याची संधी नव्या कार्यकर्त्यांना मिळणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

आघाडीतील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याची भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची रस्सीखेचच सुरू आहे. खासदार विशाल पाटील यांना भाजपाने दोनदा पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती, तशीच मलाही दिली होती. पण आमचे सारे व्यवहार पारदर्शी असल्याने मला काँग्रेस पक्ष सोडून कुठेही जायची गरज नाही. मी कॉँग्रेसमध्येच राहणार.
पृथ्वीराज पाटील, सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news